ज्येष्ठ नागरिकांची डिजिटल अटक करून आर्थिक फसवणूक, जळगावातील तरुणाला अटक

नाशिक क्राईम ब्रँच येथून बोलतोय, तुमच्या खात्यामध्ये बेकायदेशीर पैसे आले आहेत त्याची पडताळणी करायची असून या गुह्यांत तुमचे नाव येत आहे, अशी बतावणी करत सायबर गुन्हेगाराने काळाचौकी येथील एका ज्येष्ठाला डिजिटल अटक केली. मग त्यांना भीती दाखवत नऊ लाख 77 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. त्या फसवणूक करणाऱया भामटय़ाला काळाचौकी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

काळाचौकी परिसरात राहणाऱया एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर गुन्हेगाराने मी नाशिक गुन्हे शाखेचा अधिकारी बोलतोय, तुमच्या खात्यामध्ये बेकायदेशीर पैसे आले असून त्या प्रकरणात तुमच्यावर कारवाई होणार असे घाबरवत डिजिटल अटक केली. त्यानंतर या प्रकरणातून बाहेर काढतो असे सांगत त्यांच्याकडून नऊ लाख 70 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या नागरिकाने काळाचौकी पोलिसांत धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यावर सपोनि राऊत, महिला उपनिरीक्षक शीतल माने व पथकाने तांत्रिक बाबींचा कसून तपास केल्यावर ज्येष्ठ नागरिकाला फसविणारा हा जळगावातील भुसावळचा रहिवासी असल्याचे समजले. त्यानुसार आणखी खोलात जाऊन तपास करत पथकाने राहुल बागल (34) या तरुणाला पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.

Comments are closed.