खडसेंच्या बंगल्यात चोरी करणारे दोघे जेरबंद, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड जप्त

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले चोरटे उल्हासनगरचे आहेत. मात्र खडसे यांनी दावा केलेली सीडी आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचा मात्र थांगपत्ता पोलिसांना लागला नाही.
ऐन दिवाळीच्या धामधुमीत एकनाथ खडसे यांच्या जळगावातील बंगल्यात चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रे आणि भाजप नेत्यांचे कारनामे असलेली सीडीही चोरीस गेल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. पोलिसांनी या चोरीचा छडा लावत चिराग सय्यद आणि कैलास खंडेलवाल या दोघांना ताब्यात घेतले. मात्र प्रत्यक्ष बंगल्यात शिरून चोरी करणारे तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत. एजाज अहमद, मोहंमद बिलाल आणि बाबा अशी या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रार फक्त दागिने चोरीची
आज ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा 6.21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भाजप नेत्यांचे कारनामे असलेली सीडी आणि महत्त्वाची कागदपत्रे मात्र पोलिसांना सापडली नाहीत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी खडसे यांनी फक्त दागिने चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास करून मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर एकूण 27 गुन्हे दाखल असून त्यापैकी काही इतर राज्यांतील आहेत, असेही ते म्हणाले.
			
											
Comments are closed.