जळगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट, ठाकरेंच्या नेत्याकडून भाजप आमदाराचं वाजंत्री लावून स्वागत, कट्
जलगाव राजकारण: जळगावच्या राजकारणात सध्या एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. भाजपाचे आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपमहापौर आणि सध्या बाजार समितीचे सभापती असलेले सुनील महाजन (Sunil Mahajan) हे दोन जुने राजकीय विरोधक एका व्यासपीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे, यावेळी सुनील महाजन यांनी स्वतः आमदार सुरेश भोळे यांचे वाजंत्री लावून जंगी स्वागत केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आ. सुरेश भोळे आणि सुनील महाजन हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आपापल्या पक्षाचे प्रभावशाली नेते मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये तीव्र राजकीय वैमनस्य पाहायला मिळत होते. दोन्ही नेत्यांनी याआधी एकमेकांवर जोरदार टीका देखील केलेली आहे.
आमदार सुरेश भोळे यांचे वाजंत्री लावून स्वागत
काल एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सुरेश भोळे बाजार समिती कार्यालयात गेले असता, तेथे सभापती सुनील महाजन यांनी त्यांचे भव्य स्वागत वाजंत्री लावून केले. हा क्षण नेहमीचे प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांच्या संबंधात “नव्या सुरुवातीचं” द्योतक ठरतोय, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो : आ. भोळे
या प्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी माध्यमांशी बोलताना “राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो,” असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं घडत असल्याची शक्यता बळावली आहे.
गिरीश महाजन यांचा सूचक सल्ला आणि बदललेलं वातावरण
गेल्याच आठवड्यात मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना जाहीर भाषणात “भाजपामध्ये येणाऱ्या कोणत्याही विरोधकाला विरोध करू नका,” असा सल्ला दिला होता. गिरीश महाजन यांनी दिलेला सल्ला आणि त्यानंतर लगेच भोळे – महाजन हे एकत्र एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुनील महाजन भाजपमध्ये?
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून सुनील महाजन हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आ. सुरेश भोळे यांनी त्याला आधी उघड विरोध दर्शविला होता. मात्र, दोन्ही नेते एकत्र आल्याने सुनील महाजन भाजपमध्ये प्रवेश? याबाबत चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आता सुनील महाजन हे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.