जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला


जळगाव : प्रशासन आणि पोलीस खात्याने कितीही कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील वाळू माफियांची मुजोरी कायम असल्याचं दिसून येतंय. चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला त्याचा जीव गमवावा लागला असता. कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न (Jalgaon Crime) झाला. त्यामुळे जळगावातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय.

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदी पात्रात महसूल विभागाचे पथक गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी काही ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. कारवाई करताना अंधाराचा फायदा घेऊन इतर वाहने पसार झाले. मात्र एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला.

ट्रॅक्टरवरून खाली खेचले

हाती लागलेला ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयात नेण्यात येत असताना, ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी जडे यांना चालक आणि मालकाने ट्रॅक्टर वरून खाली खेचले. त्या दोघांनी तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीत तलाठी जडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जोरदार मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपींवर कडक कारवाई करणार

या कारवाईबाबत माहिती देताना चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर पाच कर्मचारी त्या ठिकाणी गेले. घटनास्थळी काही वाहने होती, मात्र अंधाराचा फायदा घेऊन ती पसार झाली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या हाती यावेळी एक ट्रॅक्टर लागला. तो तहसीलदार कार्यालयाकडे घेऊन येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी वाळू उपशाला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. या आधीही एका नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई करणार असल्याचं तहसीलदार म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.