बिबट्या आला अंगावर, घेतला खांद्यावर! प्राणांची बाजी लावून शेतकऱ्याने बिबट्याची मानगूट दाबली, जिवंत वन विभागाच्या हवाली केले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्या अंगावर येताच त्या शेतकऱ्याने तसाच उचलून त्याला खांद्यावर घेतला. बिबट्याची आणि शेतकऱ्याची अंगावर काटा आणणारी झटापट सुरू झाली. बिबट्याने पंजा मारून रक्तबंबाळ केले तरी शेतकऱ्याने वन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत बिबट्याची मानगूट सोडली नाही. वन विभागाचे पथक आल्यानंतर शेतकऱ्याने जिवंत बिबट्या त्यांच्या स्वाधीन केला! हा थरारक प्रकार पाहून पथकही रोमांचित झाले!

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथील मुकेश नाना डोंगरे हा आपल्या शेतात काम करत होता. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने हल्ला केल्यानंतर कोणाचाही अंगाचा थरकाप उडाला असता.

बिबट्याने मुकेशला जखमी केले. दोघांची झटापट सुरू झाली. मुकेशने बिबट्याची मानगूट पकडून त्याला दूर लोटले. त्यामुळे बिबट्या चवताळून अंगावर धावून आला. बिबट्या अंगावर धावून येताच मुकेशने त्याची मानगूट आवळून त्याला खांद्यावर घेतले. मानगूट दाबल्यामुळे बिबट्याची हालचाल मंदावली. याचाच फायदा घेत मुकेशने पायाने त्याचे मुंडके दाबले आणि दोन्ही हाताने त्याचे पाय धरून ठेवले. हल्ला करण्यासाठी आलेला बिबट्याच जेरबंद झाला. त्यानंतर आरडाओरड करून त्याने शिवारातील इतरांना बोलावले.

रक्तबंबाळ अवस्थेत मुकेशने बिबट्याला जागेवरच जेरबंद केल्याचे पाहून ग्रामस्थांची बोबडी वळली. ही खबर तत्काळ वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत बिबट्याला तसेच धरून ठेवण्यात आले होते. वन विभागाचे पथक येताच मुकेशने जिवंत बिबट्या त्यांच्या स्वाधीन केला. मुकेशचे हे अद्भूत धाडस पाहून वन विभागाचे पथकही रोमांचित झाले. पथकाने मुकेशच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. बिबट्याशी दोन हात करताना मुकेशही जखमी झाला असून, त्याच्यावर जामनेर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments are closed.