प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, जालन्यात थरार

जलना गुन्हा: जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावात थरारक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका पित्याने स्वतःच्या 17 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीपोटी पित्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

नेमकं घडलं काय?

जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातल्या दावलवाडी गावामध्ये मुलीच्या प्रेमसंबंधामुळे बदनामी होईल म्हणून पित्यानेच आपल्या 17 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आलीय, याप्रकरणी आरोपीने मुलीची हत्या करून तिने घरातच गळफास घेतल्याचा बनाव देखील केला होता, शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा तपास पोलीस करत असताना पोलिसांना याचा संशय असल्याने पोलिसांनी आरोपी पिता हरी जोगदंड याला काल अटक केल. आरोपींनी या प्रकरणाची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय ,या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आत्महत्येचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल

ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पित्याने मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना या मृत्यूबाबत संशय आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपीवर बारकाईने नजर ठेवली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशीत अखेर आरोपी पिता हरी जोगदंड याने मुलीच्या खुनाची कबुली दिली. त्याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गावात संतापाचे वातावरण

या घटनेमुळे दावलवाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या पित्याच्या कृत्याबद्दल गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रेमसंबंध हा गुन्हा नसतानाही मुलीचा जीव घेणे ही अमानुष कृती असल्याचे गावकरी सांगत आहेत. या खुनामागची संपूर्ण कारणमीमांसा आणि नेमक्या कोणत्या परिस्थितीत आरोपीने असे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याप्रकरणी पुढील काही उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.