संतापजनक! जालन्याच्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर लाथ मारली, चिमुकल्या लेकरालाही पकड

जालना: स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यामध्ये आल्या होत्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण  पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत आहे  असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारलेल्या पोलिसावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होत आहे. पोलिसांनी यावेळी एका चिमुकल्या लेकरालाही हाताला धरून सोबत नेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

घटनेवरती रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

या घटनेचा व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एकवेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करुनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कंबरेत डीवायएसपी (DYSP) अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा’, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचाही संताप

अंधारातले अत्याचार कसे असतील पोलिसांचे ….? जालना येथे डीवायएसपी (DYSP) दर्जाचा अधिकारी भर रस्त्यावर लाथ घालतोय हा व्हिडीओ व्हायरल  झाला आहे.त्यामुळे त्याच्यावर कारवाई होईल..व्हिडीओ निघाला म्हणून होईल पण अंधाऱ्या कोठडीत आजपर्यंत अनेकांना जी मारहाण झाली ती चर्चा कधी होईल…?  सध्या मी लक्ष्मण माने यांचे किटाळ पुस्तक वाचतोय..पद्मश्री आणि माजी आमदार असलेल्या लक्ष्मण माने यांच्यावर 6 महिला एकाचवेळी बलात्कार फिर्याद दाखल करतात आणि 3 महिने ते कोठडीत काढतात. पण त्यांच्या इतर स्थानाचा विचार न करता पोलिसांनी त्यांना ज्या शिव्या दिल्यात त्या वाचवत नाहीत.  68 वर्षांच्या या लेखकाशी महिला पोलिस त्यांची गचांडी पकडून मारायला लागते. लिंगवाचक अश्लील बोलते.. चड्डी उतरवण्याची भाषा….केवळ फिर्यादीत लिहिले म्हणून निरोध कोणत्या दुकानातून घेतले म्हणून मेडिकल दुकानातून फिरवतात…समोर तासनतास  उभे ठेवतात..शिवीनेच प्रत्येक वाक्य सुरू होते.

68 वर्षांच्या पद्मश्री मिळालेल्या लेखकाला पोलिस असे वागवत असतील..तर इतरांचे काय बोलावे..? आंदकोळ पुस्तकाचे लेखक व कार्यकर्ते किसन चव्हाण सांगत होते की, पारधी तरुणांशी पोलिस जे वागतात ते अविश्वसनीय असते. एकमेकांचे लिंग तोंडात घेण्यापासून तर पायाची शीर तोडण्यापर्यंत टोकाच्या शिक्षा आहेत..गिरीश प्रभुणे यांच्या पारधी पुस्तकात रक्त येऊ न देता पायाची शीर तोडून जायबंदी करण्याचा प्रसंग वाचवत नाही..एक ठिकाणी पोलिस लहान अर्भक बुटाखाली दाबतात…पारधी महिलांच्या फुटलेल्या बांगड्या अनेक कोठड्यांनी बघितल्या आहेत..किंकाळ्या ऐकल्या आहेत.. फुलन देवीच्या पुस्तकात पोलिस कोठडीत झालेले बलात्कार वाचवत नाहीत…गरिबांशी पोलिस ज्या प्रकारचे वर्तन करत असतात त्याची चर्चाही होत नाही….जोशी अभ्यंकर खून खटल्यातील आरोपी मुनावर शाह त्याच्या येस आय एम गिल्टी पुस्तकात लिहितो की, आम्हाला इतके बेदम मारत होते की या खुनाची काय आम्ही केनेडी यांच्या खुनाची सुद्धा कबुली सहज देऊन टाकली असती….मुद्दा हा की पोलिसांचा पारंपरिक बाज बदलून त्यांना जबाबदार कसे बनवायचे ? गरीब लोकांशी वागणे कसे बदलायचे ? सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला असेल ? याची झलक यातून दिसते आहे…हाच पुरावा आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी लिहली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.