जालना महापालिकेच्या आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई; दहा लाखांची रोकड जप्त

जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेतील विविध विकासकामांच्या बिलांची रक्कम मंजूर करण्यासाठी खांडेकर यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (16 ऑक्टोबर 2025) रात्री उशिरा खांडेकर यांच्या राहत्या घरी सापळा रचला. कारवाई दरम्यान दहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, जी लाच रक्कम म्हणून स्वीकारली जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खांडेकर यांच्यावर यापूर्वीही ठेकेदारांकडून बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याचे आरोप वारंवार झाले होते. मात्र, यावेळी विभागाने थेट कारवाई करून त्यांना रंगेहात पकडले आहे. सदर प्रकरणातील एकूण मागितलेली लाच रक्कम किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अधिकृत प्रेस नोट लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे जालना महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेतील ठेकेदार, अभियंते आणि कर्मचाऱ्यांमध्येही या कारवाईनंतर मोठी खळबळ आहे.
फटाक्यांची आतषबाजी
पालिका आयुक्त खांडेकर यांना ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आणल्यानंतर एसीबी अधिकारी कार्यालयात पुढील कार्यवाही करत असताना कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे देखील पहायला मिळाले. दरम्यान शासकीय निवासस्थानी व खांडेकर यांना आणलेल्या कार्यालयासमोर पहिल्यांदा नागरिकांची गर्दी जमली होती.
Comments are closed.