Jalna News – अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काढला काटा, आरोपींना पोलिसांकडून अटक

अनैतिक संबंधात ठरणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने काटा काढला. जालन्यातील बदनापूर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे बदनापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर राम तायडे (28) आणि मनिषा परमेश्वर तायडे (25) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
सोमठाणा येथील मनिषा तायडे हिचे सख्खा लहान दीर ज्ञानेश्वर तायडे याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या संबंधात पती परमेश्वर राम तायडे (30) हा अडथळा ठरत होता. यामुळे ज्ञानेश्वर आणि मनिषाने मिळून 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास परमेश्वरवरची कुर्हाडीने डोक्यात व चेहर्यावर वार करत आणि मफलरने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या मुरघासच्या भोतात भरून दोरीने बांधले. यानंतर दगड बांधून वाला–सोमठाणा तलावात फेकून दिले.
12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बदनापूर हद्दीतील निकळज शिवारामधील वाल्हा–सोमठाणा तलावात प्लास्टिकच्या मुरघासच्या भोतात गुंडाळलेले एक अज्ञात प्रेत आढळून आले. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आणि ओळख पटविल्यावर तो परमेश्वर राम तायडे हा सोमठाणा येथील रहिवासी असल्याचे समोर आले.
मयताचे वडील राम नाथा तायडे (56) रा. सोमठाणा यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वेगाने तपास करत आरोपींचा छडा लावला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. परमेश्वरचा पत्नी मनिषा आणि लहान भाऊ ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक संबंधांना विरोध होता. संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून परमेश्वरची हत्या केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments are closed.