318 वर्षांनंतर जालन्यात रंगला संत मुक्ताबाई पालखीचा ‘रिंगण सोहळा’, टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाच्या जयघोषाने JES मैदान दुमदुमले

छायाचित्र – अमृत तारो

शहराच्या इतिहासात आज सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा क्षण जालनाकरांनी अनुभवला. श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून खान्देश आणि विदर्भातील वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी जालन्यातील जे.ई.एस. महाविद्यालय मैदानावर अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. जालना शहरात तब्बल 318 वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा भव्य रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी जालना शहर आणि जिल्ह्यातील भाविकांनी मैदानावर तोबा गर्दी केली होती.

श्री संत मुक्ताबाईंची पालखी शनिवारी जालना शहरात दाखल झाली होती. शहरातील कन्हैया नगर येथे पालखीचा रात्रीचा मुक्काम होता. रविवारी पहाटे महाआरती आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखीने जे.ई.एस. मैदानाकडे प्रस्थान केले. 318 वर्षांनंतर पहिल्यांदाच जालन्यात रिंगण सोहळा होणार असल्याने सकाळपासूनच संपूर्ण शहरात प्रचंड उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते.

जे.ई.एस. महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर दुपारच्या सुमारास रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. टाळ-मृदंगाचा कडकडाट, ज्ञानोबा-तुकाराम आणि संत मुक्ताबाई यांचा अखंड जयघोष करत वारकऱ्यांनी मैदानाची परिक्रमा केली. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी खेळलेल्या पारंपरिक फुगड्या, गायलेले अभंग आणि भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकऱ्यांचा उत्साह या वेळी ओसंडून वाहत होता. जालनेकरांनी पहिल्यांदाच डोळ्यांसमोर चालणारे हे रिंगण पाहून मनोभावे हात जोडले.

दरम्यान, जालना शहराच्या इतिहासात हा क्षण ऐतिहासिक आहे. ३१८ वर्षांनंतर आदिमाया मुक्ताबाईंच्या पालखीचे रिंगण आमच्या शहरात व्हावे आणि त्याचे साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळावी, हे आमचे मोठे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया एका भाविकाने दिली.

दर्शनासाठी अलोट गर्दी

मुक्ताईच्या दर्शनासाठी भाविकांच्या मैदानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या स्वागतासाठी जालना शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी चोख व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आली होती.

चोख नियोजन

हा ऐतिहासिक सोहळा शांततेत आणि शिस्तीत पार पडावा यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. जे.ई.एस. मैदान परिसर आणि शहरात वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले होते, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

Comments are closed.