बारमध्ये बिअरचे बिल भरण्याच्या बदल्यात फाईलवर सही; तलाठ्याचा प्रताप समोर, मद्यधुंद अवस्थेतील व
जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात नाजा येथील तलाठ्याने एका फाईलवर सही करण्यासाठी बियरबारचे बिल भरण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जैनपूर कोठारा गावातील विकलांग असलेल्या महिलेने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज केला होता. मात्र अर्जावर तलाठी सही करत नसल्यामुळे गावातील एका युवकाने तलाठ्याला गाठून सही करण्याची विनंती केली, मात्र तलाठ्याने पैशाची मागणी करत हॉटेलचे बिल दिल्याशिवाय सही करणार नसल्याचं सांगितलं. हा सर्व प्रकार गावातील तरुणाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागातील एका तलाठ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावर सही व शिक्का देण्यासाठी संबंधित तलाठ्याने चक्क बियर बारचे बिल भरण्याची अट घातल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांनी ही मागणी नाकारताच तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेत बारमध्येच उभा राहून अर्जावरील सही खोडून टाकली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैनपूर कोठारा (ता. भोकरदन) येथील एका विकलांग महिलेनं इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. अर्जावर तलाठ्याची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक असल्याने तिने आणि तिच्या नातेवाईकांनी वारंवार तलाठ्याशी संपर्क साधला. मात्र तलाठी सतत टाळाटाळ करत असल्याने अखेर नातेवाईकांनी त्यांना फोनवरून विनंती केली.
तेव्हा तलाठी महाशय बियर बारमध्ये बसलेले असून त्यांनी संबंधितांना बारमध्येच बोलावलं. नशेत असलेल्या तलाठ्याने थेट बारचं बिल भरण्याची मागणी केली आणि त्यांना सोबत बसण्याचं आमंत्रण दिलं. सुरुवातीला अर्जावर सही केली, पण संबंधितांनी बिल भरण्यास नकार दिल्यानंतर चक्क त्या अर्जावरील सहीच खोडून टाकली. यावर थांबता न राहता तलाठ्याने संबंधित महिला अर्जदारालाच बारमध्ये बोलावून आणण्याचा हट्ट धरला. त्याचबरोबर “असा अर्ज कसा मंजूर होतो ते दाखवतो” अशा शब्दांत धमकी दिल्याचे सांगितले जाते.
हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका अपंग महिलेच्या हक्काच्या योजनेसाठी जबाबदार महसूल अधिकाऱ्याने घेतलेली अशा प्रकारची दारूच्या नशेतली दादागिरी आणि अट्टाहास प्रशासनाच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो. आता या प्रकरणात पोलिसांकडून संबंधित तलाठीवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकलांग पेन्शन योजनेसाठी अर्जावर सही देण्यासाठी तलाठ्याने बियर बारचे बिल भरण्याची मागणी केली. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.#जेलेन्यूज #क्रिमहेन्यूज #व्हिडीओव्हिल्ड pic.twitter.com/fvj6nokpbl
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) 14 सप्टेंबर, 2025
आणखी वाचा
Comments are closed.