हा बिहार आहे की महाराष्ट्र? 4 वर्षांपासून शिक्षक गैरहजर, एका शिक्षकावर 5 वर्गाचा भार; जालना जिल्ह्यातील रामगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेची परवड

हा महाराष्ट्र आहे की बिहार, असा प्रश्न पडावा, अशी अवस्था शाळांची झाली आहे. जिल्हा परिषदेचा एक शिक्षक चार वर्षांपासून शाळेवरच येत नाही आणि शिक्षण विभागाला माहितीच नसते! चार वर्षांपासून पाच वर्गाचा भार एकाच शिक्षकाने उचलला. शेवटी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना जाग आली आणि तत्काळ शाळेला शिक्षक मिळाला. ही कथा आहे जालना जिल्ह्यातील रामगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेची!

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील रामगव्हाण बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. त्यापैकी आबासाहेब अमृते २७ जून २०२२ पासून आजतागायत गैरहजर आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर पहिली ते पाचवी असा पाच वर्गांचा भार आला. गेल्या चार वर्षांपासून ते हा भार उचलत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने पालकांनी अनेकवेळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या. परंतु कुणीही दखल घेतली नाही.

पालक, ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी गुरुवारी शाळेला कुलूप ठोकले. आठ दिवसांत शाळेला शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात वर्ग भरवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष भारत चांदणे, ग्रामपंचायत सदस्य मालन गाढे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साबळे, चंद्रकांत डोमाळे, शेख नूर, संदीप गायकवाड, इंदर साबळे, भगवान नागरे, प्रयागबाई पांढरे, पूनम गाढे, शंकुतला गायकवाड आदींची उपस्थिती होती.

कुलूप ठोकताच शिक्षण विभाग ताळ्यावर

रामगव्हाण शाळेवरील शिक्षक आबासाहेब अमृते यांची चार वर्षांपासून विभागीय चौकशी सुरू आहे. आज ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकताच कुंभकर्णी झोपेत असलेला शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. गटशिक्षण अधिकारी रवि कवडे यांनी रामगव्हाण शाळेवर तत्काळ दुसरा शिक्षक नेमण्यात आल्याचे सांगितले.

शिक्षक मिळण्यासाठी चार वर्षांपासून पाठपुरावा…

चार वर्षांपासून एक शिक्षक गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्यावा एवढीच आमची जिल्हा परिषदेकडे मागणी होती. परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जाऊन शिक्षक देण्याची मागणी केली. परंतु केवळ आश्वासनच मिळाले. त्यामुळे शाळेला कुलूप ठोकावे लागले, असे शालेय समितीचे अध्यक्ष भारत चांदणे यांनी सांगितले.

Comments are closed.