हक्काच्या पाण्यासाठी आज जामखेड शहर बंदची हाक

जामखेड शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. कधी 15 दिवस, तर कधी महिनाभर नळाला पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, शहरातील 30 वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तब्बल 50 किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याने जामखेडच्या पाणीप्रश्नाची तीव्रता स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी (दि. 15) जामखेड शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

जामखेड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दहिगाव-जामखेड आणि उजनी-जामखेड पाणीपुरवठा योजनांची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, सात वर्षांचा कालावधी उलटूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने या योजनांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

जामखेडच्या पाणीप्रश्नावर भाजप नेत्याचा घराचा आहेर

शहरातील तीव्र पाणीटंचाई, उजनी पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम, रस्त्यांची दुरवस्था आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पातील जामखेडच्या पाणीहक्काचा प्रश्न यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन परखड भूमिका मांडली. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपामधीलच ज्येष्ठ नेत्याने जामखेडच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुकडीचे पाणी आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नियमानुसार जामखेड तालुक्याला कृष्णा खोऱ्यातून 6 टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी करत जामखेडमधील प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी अपेक्षित आवाज उठवला जात नसल्याची खंत प्रा. राळेभात यांनी व्यक्त केली.

तीन प्रमुख मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जामखेड शहराला दर सहा दिवसांनी स्वच्छ व नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली उजनी-जामखेड पाईपलाईन योजना तातडीने पूर्ण करावी.दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शहर व वाड्या-वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, महिला, तरुण, शेतकरी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.