जम्मू-श्रीनगर महामार्ग चौथ्या दिवसासाठी बंद

श्रीनगर:

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-44) अतिवृष्टी, भूस्खलन आणि मार्गावरील अनेक हिस्से वाहून गेल्याने सलग चौथ्या दिवशीही म्हणजेच शुक्रवारीही वाहतुकीसाठी बंद राहिला. दुसरीकडे जम्मूच्या पुंछ जिल्ह्याला काश्मीरच्या शोपियां जिल्ह्याशी जोडणारा आंतरक्षेत्रीय मुगल रोड तीन दिवस बंद राहिल्यावर वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि सिंथन रोड अनेक ठिकाणी भूस्खलन, चिखल आणि दगड कोसळल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.  हा महामार्ग 26 ऑगस्टपासून अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे अनेकदा वाहतुकीसाठी ठप्प झाला होता. 30 ऑगस्ट रोजी काही तासांसाठी हा महामार्ग खुला करण्यात आला होता, परंतु आतापर्यंत एकूण 10 दिवसांपर्यंत हा महामार्ग बंद राहिला आहे. यामुळे कथुआपासून काश्मीरपर्यंत विविध ठिकाणी 3700 हून अधिक वाहने अडकून पडली आहेत. मुगल रोडवर हलकी मोटर वाहने (एलएमव्ही) आणि प्रवासी तसेच खासगी कार्सना पुंछपासून शोपियां आणि शोपियांपासून पुंछच्या दिशेने जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. आवश्यक सामग्रीची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमध्ये (एचएमव्ही) केवळ 6 टायर्स असलेल्या ट्रक्सना पुंछपासून शोपियांच्या दिशेने जाण्याची अनुमती आहे. याचबरोबर जम्मू-राजौरी-पुंछ महामार्ग तीन दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

नागरोटा (जम्मू)हून रियासी, चेनानी, पटनीटॉप, डोडा, रामबन, बनिहाल आणि श्रीनगरच्या दिशेने होणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांमध्ये रामबन-बनिहालचे शालगडी, नचिलाना, पंथ्याल, मरुग आणि पीराह सामील आहेत. तेथे रस्त्यांच हिस्से आणि रिटेनिंग वॉल वाहून गेले आहेत. पीराह भुयाराच्या एका हिस्स्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. उधमपूर सेक्टरमध्ये जखेनी, थारा डी, बाली नाला आणि देवालदरम्यान जवळपास 10 किलोमीटरचा रस्ता प्रभावित झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा दिल्याने वाहतूक पूर्ववत होण्याचा आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी रस्ते वाहतुकीसाठी खुले होईंपर्यंत प्रवास न करण्याचा आणि अधिकृत स्रोतांकडुन रस्त्यांच्या स्थितीची पुष्टी करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments are closed.