जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, पाच महिन्यांनंतर उघडले दरवाजे

जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला मुरुड-जंजिरा किल्ला अखेर तब्बल पाच महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. पुरातत्व खात्याने या किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने पर्यटक आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान लवकरच दिवाळीची सुट्टी लागणार असल्याने बच्चेकंपनीला ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याची संधी मिळणार आहे.
25 मेपासून जंजिरा किल्ल्याचे दरवाजे दरवर्षी बंद करण्यात येतात. किल्ला भर समुद्रात असल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर किल्ल्यावर प्रवेश करता येत नाही. खवळलेला समुद्र, उंचच उंच लाटा आणि वेगवान वारा यामुळे या किल्ल्यात प्रवेश धोकादायक असतो. पावसाळ्यामध्ये या किल्ल्यामध्ये झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात. दरवर्षी या झाडाझुडपांची पुरातत्व विभागातर्फे साफसफाई केल्यानंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो. यंदाही ही झाडेझुडपे काढण्यात आली आहेत. या वर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे साफसफाई करण्यास सतत अडथळे आल्याने हा किल्ला पाच महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला, अशी माहिती पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी दिली.
25 रुपये शुल्क
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी १५ वर्षांच्या खालील मुलांना शुल्क माफ करण्यात आले आहे. तर 16 वर्षांवरील पर्यटकांना 25 रुपये आकारण्यात येणार आहेत. ऑनलाइनची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून यंदाच्या दिवाळी सुट्टीत महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक तसेच विद्यार्थी येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Comments are closed.