जपानमध्ये कृषिमंत्र्याला महागाईवरची थट्टा भोवली, जनतेच्या रेट्यामुळे दिला राजीनामा
जपानमध्ये तांदळाच्या वाढत्या किंमती नियंत्रित होत नसल्यामुळे जपान सरकार जनतेच्या रोषाला सामोरे जात आहे. तांदळाच्या वाढत्या किंमतीवर बोलताना बेजबाबदार विधान करणे आणि त्यावर थट्टा करणे केंद्रीय कृषिमंत्र्यांना चांगलेच महागात पडले. जनतेच्या रेटय़ामुळे जपानचे कृषिमंत्री ताकू एटो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तांदळाच्या किंमती का वाढत आहेत, असा सवाल केल्यानंतर कृषिमंत्र्यांनी म्हटले की, मी कधीही तांदूळ खरेदी करत नाही. मला तो मोफत मिळतो. या विधानानंतर महागाईशी लढणाऱया सर्वसामान्यांना संताप अनावर झाला. त्यांनी वादग्रस्त विधान करणाऱया कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकांचा दबाव वाढल्याने कृषिमंत्री इटो यांनी पंतप्रधान कार्यालयात जाऊन राजीनामा दिला. तसेच केलेल्या विधानाबद्दल जनतेची जाहीर माफीसुद्धा मागितली आहे. जेव्हा लोक तांदळाच्या वाढत्या किमतींशी झुंजत आहेत, तेव्हा मंत्री म्हणून मी खूप चुकीचे विधान केले, असे म्हटले आहे. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनीही त्यांच्या मंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. दरम्यान, इटो यांच्या जागी पूर्वीचे पर्यावरण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांना कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.
Comments are closed.