आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा, बुमराचे नंबर वनचे सिंहासन शाबूत; जाडेजा-गिलही अव्वल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ताज्या क्रमवारीत हिंदुस्थानी खेळाडूंचा दबदबा कायम आहे. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराने आपले ‘नंबर वन’चे सिंहासन शाबूत ठेवले आहे. कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जाडेजा, तर वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार शुभमन गिल यांचा दबदबा कायम आहे. त्यामुळे तीन वेगवेगळय़ा प्रकारांत टीम इंडियाचे तीन शिलेदार क्रिकेट जगताच्या क्रमवारीत सिंहासनावर विराजमान आहेत.

बुमराचा दरारा

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराने 870 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पहिल्यांदा नंबर वन झाल्यानंतर त्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. न्यूझीलंडचा मॅट हेन्री 861 गुणांसह दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्प 838 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध पाकिस्तानच्या कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या साजिद खानला पाच स्थानांचा फायदा झाला असून, तो 30व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

जाडेजाचे अष्टपैलू साम्राज्य अबाधित

कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जाडेजाने 446 गुणांसह अव्वल स्थानावर आपली पकड कायम ठेवली आहे. गेल्या 1600हून अधिक दिवसांपासून तो या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माकाx यान्सेन 344 गुणांसह दुसऱ्या, तर मिचेल स्टार्प आणि बांगलादेशचा मेहदी हसन मिराज प्रत्येकी 284 गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

बाबरची दोन वर्षांनंतर टॉप-10मध्ये एण्ट्री

पाकिस्तानचा कसोटी कर्णधार बाबर आझमने तब्बल पाच स्थानांची झेप घेत कसोटी फलंदाजांच्या टॉप-10मध्ये पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटींमध्ये 193 धावा करणाऱ्या बाबरला या कामगिरीचा मोठा फायदा झाला. दुसऱ्या कसोटीत त्याने 88 धावांची खेळी केली आणि दुसऱ्या डावात नाबाद 24 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. बाबर सप्टेंबर 2024 नंतर प्रथमच कसोटी फलंदाजांच्या टॉप-10मध्ये दाखल झाला असून, सुमारे दोन वर्षांनंतर त्याने पुन्हा या मानाच्या यादीत स्थान मिळवले आहे. अब्दुल्ला शफीकनेही वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाबाद 160 धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने तब्बल 25 स्थानांची झेप घेत 32वा क्रमांक गाठला आहे.

वनडेत गिलचे सिंहासन कायम; कोहली-रोहित टॉप-4मध्ये

वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत शुभमन गिल 801 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 794 गुणांसह दुसरा, तर विराट कोहली 767 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा 758 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने तीन स्थानांची झेप घेत 11वा क्रमांक मिळवला आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 71 धावांची खेळी केली होती. अफगाणिस्तानच्याच हशमतुल्लाह शाहिदीला चार स्थानांचा फायदा झाला असून तो 50व्या क्रमांकावर आहे.

Comments are closed.