जसप्रीत बुमराह या अटीवरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार, फिटनेस अपडेट जाणून घ्या
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जसजशी जवळ येत आहे, तसतशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत चिंता वाढत आहे. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग असेल की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता एक रिपोर्ट समोर आला आहे की, बुमराह एका अटीवर स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. बुमराहनं त्याच्या दुखापतीबाबत आधीच न्यूझीलंडमधील एका तज्ज्ञाचा सल्ला घेतला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत आपला संघ जाहीर करायचा आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बुमराह एका अटीवर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग होऊ शकतो. वास्तविक, तो गोलंदाजीनंतर वेदना कमी झाल्यावरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल. या अहवालात असंही नमूद केलं आहे की, बुमराहनं आधीच न्यूझीलंडचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन शौटेन यांचा सल्ला घेतला आहे, ज्यांनी 2023 मध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली होती. ते बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्याही संपर्कात आहेत.
बुमराहला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान त्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला. त्यानंतर तो सामन्यादरम्यानच स्कॅनसाठी गेला होता. स्कॅन झाल्यानंतर बुमराहनं भारताच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. मात्र तो फलंदाजीसाठी मैदानात आला होता.
जसप्रीत बुमराह 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्यानं संपूर्ण मालिकेत 13 च्या सरासरीनं 32 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी बुमराहला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यानंतर तो आता इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत खेळणार नाही, हे जवळपास पक्कं आहे.
हेही वाचा –
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक; सामन्याची वेळ, ठिकाण A टू Z जाणून घ्या
भारताचा स्टीव्ह स्मिथ? तरुण फलंदाजाने केली हुबेहूब नक्कल; व्हायरल VIDEO नक्की पाहा
“गौतम गंभीरने एकट्याने आयपीएल जिंकवले नाही, पण सगळं श्रेय त्याला मिळालं”; माजी खेळाडू बरसला
Comments are closed.