जसप्रीत बुमराहने कसोटी संघाचे नेतृत्व करू नये, जाणून घ्या रवी शास्त्रींच्या विरोधाचे कारण काय ?

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा पुढचा कर्णधार ठरवताना भविष्याचा विचार करून नीट निर्णय घ्यावा, असे आवाहन भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. अनुभवी खेळाडूपेक्षा तरुण खेळाडूकडे नेतृत्व द्यावे, असे ते म्हणाले आहेत. द आयसीसी रिव्ह्यूशी बोलताना रवी शास्त्री यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कर्णधार पद देण्यास विरोध दर्शवला आहे. त्याऐवजी शुबमन गिल आणि रिषभ पंत यांच्यापैकी एकाला कर्णधार पद देण्यात यावे, असे ते म्हणाले.

मागच्या काही दिवसात रोहित शर्मा कर्णधार असताना जसप्रीत बुमराहने उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान दोन कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवले होते. बुमराहच्या नेतृत्वाखाली पर्थ येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळाला होता. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे त्याला सामना सुरू असतानाच बाहेर बसावे लागले. सिडनी येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

रवी शास्त्री म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच कर्णधार असेल, असेच सर्वांना वाटते. पण मला वाटते की बुमराह कर्णधार होऊ नये, कारण कर्णधार मिळेल, पण एका गोलंदाजाला आपण मुकू शकतो.

सिडनी येथील सामन्यानंतर या वर्षीच्या सुरुवातीला जवळपास तीन महिने पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह क्रिकेटपासून दूर राहिला होता. 31 वर्षीय बुमराहला कर्णधारपद देऊन त्याच्यावर दबाव वाढविण्यापेक्षा एक चांगला गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला पाहिजे, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

रवी शास्त्री पुढे बोलताना म्हणाले, “तो आता गंभीर दुखापतीमधून बाहेर आला आहे. मला वाटते बुमराहने एकावेळी एकाच ठिकाणी लक्ष द्यावे. तो सध्या आयपीएल खेळतोय, तिथे 4 षटके टाकायची असतात. पण कसोटी सामन्यात 10, 15 षटके गोलंदाजी करण्याचे आव्हान असेल. तसेच कर्णधार म्हणूनही त्याच्यावर दबाव असू शकेल.

जसप्रीत बुमराहच्या ऐवजी सध्याच्या तरूण खेळाडूकडे नेतृत्व द्यायला हवे असे ते म्हणाले . तरूण खेळाडूला संधी दिल्यास त्यांना दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करता येईल. गिल आणि पंत हे दोघेही आयपीएल टीमचे कर्णधार आहेत. तसेच कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत. तुम्हाला एखाद्या खेळाडूला तयार करावे लागेल आणि शुबमन चांगला पर्याय असू शकतो. तो 25-26 वर्षांचा आहे. त्याला वेळ द्यायला हवा, असेही शास्त्री म्हणाले.

याबरोबर रिषभ पंतचेही वय कमी आहे. दोघांनीही आयपीएलमधील संघाचे नेतृत्व करताना कर्णधार पदाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली तर ते जास्त चांगले होईल असेही ते म्हणाले.

Comments are closed.