“2027 च्या विश्वचषकापर्यंत जसप्रीत बुमराहने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू नये…”, रवी शास्त्रींचा वेगवान गोलंदाजाला सल्ला
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये खेळू नये, असा सल्ला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे. तसेच शास्त्री यांनी न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी निवड झालेल्या भुवनेश्वर कुमारच्या पुनरामनाचे स्वागत केले आणि मोहम्मद शमीने संघात पुनरागमन करण्यासाठी पुरेशी कामगिरी केली असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
भारत २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडच्या आव्हानात्मक दौऱ्याला सुरूवात करणार आहे. या दौऱ्यात ५-५ सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघ निवडले गेले असता पुन्हा एकदा शमीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
“बुमराहने कसोटी क्रिकेट खेळावे आणि दुखापत टाळण्यासाठी २०२७ च्या वर्ल्ड कपपर्यंत अधूनमधून एकदिवसीय आणि टी२० सामन्यांमध्ये खेळावे”, असे शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले.
बुमराहची न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तो भारताकडून शेवटचा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील शेवटचा सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. तसेच त्याने शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२५ मध्ये खेळला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये आपली पात्रता टिकवून ठेवण्यासाठी भारताला न्यूझीलंड दौऱ्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तेथे बुमराह महत्त्वाचा खेळाडू ठरेल.
“मला बुमराहला कसोटी सामन्यांसाठी संघात ठेवायला आवडेल. ते खूप महत्त्वाचे आहे. तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. तसेच त्याचा इतर फॉरमॅटमध्ये जपून वापर केला पाहिजे,” असेही शास्त्रींनी पुढे म्हटले आहे.
न्यूझीलंड दौरा सोपा नसणार असे बोलताना शास्त्री म्हणाले, “न्यूझीलंड दौरा ही एक कठीण परिक्षा आहे. त्यांना त्यांच्याच मैदानावर पराभूत करणे सोपे नाही. केवळ ऑस्ट्रेलियाच त्यांच्यावर वरचढ आहे.”
शास्त्री यांच्या मते, शमीने भारतीय संघात पुनरामन करण्यासाठी पुरेशी कामगिरी केली आहे. ते म्हणाले, “शमीने रेड आणि व्हाईट बॉल अशा दोन्ही संघात बोलावले जाण्याइतकी कामगिरी केली आहे.”
शमी सध्या रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने या हंगामाच्या आपल्या पहिल्याच डावात ४ आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेतली होती. त्याने ही कामगिरी दिल्लीविरुद्ध केली होती, मात्र या कामगिरीनंतरही त्याच्याकडे भारतीय निवड समितीने दुर्लक्ष केले. (“Jasprit Bumrah should not play in all three formats”, Ravi Shastri advises the fast bowler)
Comments are closed.