जव्हारच्या झेडपी शाळेतील विद्यार्थी गुरे चारणार, 9 वी, 10 वीच्या वर्गाला शिक्षकच नाही; हातेरीतील पालकांनी शिक्षण विभागाला विचारला जाब

राज्य सरकार विद्यार्थ्यांवर हिंदी लादण्यासाठी आटापिटा करत असतानाच जव्हारच्या हातेरी येथील जिल्हा परिषद शाळेत नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या मुलांना गुरे चारायला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही वर्गामध्ये जोपर्यंत शिक्षक येत नाहीत तोपर्यंत 57 विद्यार्थी आता गुरे चारायला जाणार आहेत. पालकांनी तशी परवानगीच शिक्षण विभागाकडे मागितल्याने झेडपी प्रशासनाचा ‘शिक्षणाच्या आयचा घो’ चव्हाट्यावर आला आहे.
जव्हार तालुक्यातील हातेरी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ली ते 10 वीपर्यंत एकूण 233 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यापैकी इयत्ता 9 वीत व इयत्ता दहावीमध्ये 57 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या दोन्ही वर्गांना एकही शिक्षक नाही, त्यातील 3 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे आमच्या मुलांनी शाळेत बसून तरी फायदा काय, आमच्या मुलांच्या शिक्षणाकरिता शिक्षक द्या, नाहीतर आमच्या मुलाला शाळेत पाठविण्यापेक्षा गुराखी म्हणून पाठवतो, नुसते शाळेत दिवसभर बसून उपयोग काय, असा सवाल विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे. पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निवेदनच दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
गट शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे
आमच्या हातेरी गावातील जिल्हा परिषद शाळेत माध्यामिक शिक्षक दिल्याशिवाय आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अधिकाऱ्यांना आम्ही तसे साकडेच घातले असल्याचे पालक जगदीश जंगली यांनी सांगितले.
Comments are closed.