जय शहा यांची आर्थिक परिषदेवर नियुक्ती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे (आयसीसी) अध्यक्ष जय शाह यांची नियुक्ती ‘यंग ग्लोबल लिडर्स क्लास ऑफ 2026’ या संस्थेचे सदस्य म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची सूचना जागतिक आर्थिक परिषदेकडून करण्यात आली. शाह यांनी जागतिक क्रिकेटला आकार देण्यात जे मोलाचे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन त्यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जागतिक क्रिकेटच्या क्षेत्रात जय शाह यांची कामगिरी प्रशंसनीय आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते सर्वात तरुण वयाचे सचिव राहिले आहेत. ‘इंडियन प्रीमीयर लीग’च्या (आयपीएल) जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोठे आहे. 2028 च्या लॉस एंजल्स ऑलिंपिक्स स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. अशाप्रकारे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला ठसा उमटविला असून ‘यंग ग्लोबल लिडर्स’ संस्थेचे सदस्य म्हणून झालेली त्यांची नियुक्ती, त्यांनी जागतिक क्रिकेट क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे प्रतिबिंब आहे. आयसीसीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी क्रिकेटचा जगभर प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले. क्रिकेटसंदर्भातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे, विविध नव्या देशांचा क्रिकेटमधील सहभाग वाढविणे, प्रस्थापित तसेच नवोदित देशांमध्ये क्रिकेटला मानाचे स्थान मिळवून देणे, इत्यादी प्रशंसनीय कामे जय शाह यांनी आतापर्यंत केली.
‘वायजीएल’ ही संस्था काय आहे…
‘यंग ग्लोबल लिडर्स’ या संस्थेत 118 नेते असून ते सर्व 40 वर्षे ते 55 वर्षे या वयोगटातील आहेत. समाजसेवा, विज्ञान, उद्योग, संस्कृती आणि नागरी समाज अशा विविध क्षेत्रांमध्ये हे नेते अग्रभागी कार्यरत असतात. 2026 मध्ये टॉमस ओकमानास (नॉर्ड सिक्युरिटीचे सहसंस्थापक), थेया लाफोंड, जेनिफर झांग (वीझ एआयच्या सहसंस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच प्राध्यापक सॅली नूमाह आदी जागतिक पातळीवर नावाजलेल्या मान्यवरांना या संस्थेत स्थान मिळाले.
Comments are closed.