शेतकऱ्यांची थट्टा थांबवा; तुटपुंज्या मदतीऐवजी भरीव आर्थिक मदत द्या – जयंत पाटील
ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याऐवजी अवघ्या 5 हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार रुपयांत कसा सुटणार? सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव आहे की केवळ घोषणांच्या बाजारात स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच रस आहे? मदतीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करण्याचे सरकारने तातडीने थांबवावे, अशी मागणी शेकापच्या जयंत पाटील यांनी केली.
राज्यात सध्या सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांना दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणली जात असेल, तर हे सरकार नेमके कोणासाठी काम करत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा निषेध करतो. ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीने राज्याचा कारभार चालवता येणार नाही. विरोधी आवाज दाबल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट जनतेतील असंतोष अधिक तीव्र होतो, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले.
आज अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या पक्षांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. जनतेला आंदोलन करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय्य मदत, विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, तरुणांना संधी आणि कष्टकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. दुष्काळी परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्ष जनतेच्या हक्कांवरील कोणताही अन्याय सहन करणार नाही. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि तरुणांच्या न्याय्य मागण्यांसाठी शेकाप यापुढेही रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा योग्य आढावा घेऊन त्यांना पुरेशी आर्थिक मदत द्यावी. अन्यथा, जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्यात येईल. जनतेच्या हक्कांसाठी सुरू असलेला हा संघर्ष सत्तेच्या दबावापुढे थांबणार नाही, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
Comments are closed.