Jayant Patil NCP SP wrote letter to CM Devendra Fadnavis know the reason
मुंबई : गेल्या काही काळापासून अनेक मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलेले आहे. बीड आणि परभणी प्रकरणानंतर विरोधकांनी सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर, असे असतानाच पुण्यामध्ये झालेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अशामध्ये राज्यात होत असलेल्या राजकीय भेटीगाठींमुळे राजकारणात अनेक चर्चा सुरू आहेत. गेल्या अनेक काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांनी अनेकदा या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. अशामध्ये नुकतेच जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. असे असताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. (Jayant Patil NCP SP wrote letter to CM Devendra Fadnavis know the reason)
हेही वाचा : Datta Gade : गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याचा कोर्टात आरोपीच्या बचावासाठी वापर, वकील म्हणाले…
वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले. पण इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय? असा प्रश्न उद्भवला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. याबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एचएसआरपी नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र शासनाने एचएसआरपी नंबरप्लेटसाठी रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टम लि., रीअर मेझॉन इंडिया लि. आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या खासगी कंपन्यांना 600 कोटी रुपयांचे कंत्राट दिले. पण, या कंपन्या नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत. विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम मिळाले आहे. पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत. उदा. गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 450, गोव्यात चारचाकीसाठी 203 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 745 अशी बरीच तफावत दिसत आहे, असे जयंत पाटील पत्रात म्हटले आहे.
Comments are closed.