जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांचा जामीन फेटाळला
दुलारचंद यादव हत्याकांड प्रकरणात संशयित आरोपी
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारमधील मोकामा येथील जेडीयू आमदार अनंत सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या दुलारचंद यादव हत्याकांड प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. अनंत सिंह यांनी पाटणा सिव्हिल कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दुलारचंद हत्याकांड प्रकरणात मतदान करण्यापूर्वी अनंत सिंह यांना अटक करण्यात आली होती. पाटणा सिव्हिल कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात अनंत यांनी स्वत:ला राजकीय सूडबुद्धीचा बळी असल्याचा दावा केला. मी या प्रकरणात निर्दोष आहे. माझा संपूर्ण घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. माझी राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी माझ्यावर हे आरोप रचण्यात आले आहेत, असा युक्तिवाद अनंत सिंह यांच्यातर्फे करण्यात आला आहे.
मोकामा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान दुलारचंद यांची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपास अहवालाच्या आधारे पोलिसांनी अनंत सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले. त्यानंतर मतदानापूर्वी त्यांना अटकही करण्यात आली. 1 नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर बेऊर तुरुंगात पाठवण्यात आले. अनंत सिंह यांनी मोकामा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आरजेडी उमेदवाराचा 28,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. हा त्यांचा पाचवा विजय आहे. प्रचारादरम्यान अनंत सिंह यांनी दुलारचंद खून प्रकरणात सातत्याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. तसेच राजकीय शत्रुत्वामुळे आपल्याला अडकवले जात असल्याचेही ते म्हणाले होते.
Comments are closed.