जेईई मुख्य निकालाची घोषणा
14 विद्यार्थ्यांना ‘शतप्रतिशत’ गुणांची प्राप्ती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जेईई मेन 2025 या स्पर्धात्मक प्रवेश परिक्षेचा परिणाम घोषित करण्यात आला आहे. या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. त्यांच्या पैकी जास्त विद्यार्थी राजस्थानातील आहेत, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी प्राधिकरणाने (एनएटी) दिली आहे. शतप्रतिशत यश मिळविलेल्या 14 विद्यार्थ्यांपैकी 12 जण सर्वसामान्य वर्गातील, 1 जण अन्य मागासवर्गिय तर 1 जण अनुसूचित जाती समाजगटातील आहेत, असेही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या परीक्षेला देशभरातून 12 लाख 58 हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. 100 पैकी 100 गुण मिळविणाऱ्यांमध्ये राजस्थानचे 5, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी 2, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. या प्राधिकरणाच्या परीक्षांमध्ये मिळालेले गुण हे गुणांची सरासरी काढण्याच्या पद्धतीप्रमाणे नसतात. तर ते सामान्यीकृत किंवा नॉर्मलाईझ्ड केलेले असतात, असे स्पष्टीकरणही देण्यात आले.
सामन्यीकरण म्हणजे काय…
विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या अनेक विषयांच्या उत्तरपत्रिकांमधील गुण आणि सर्व विद्यार्थ्यांची एका सत्रातील सापेक्ष कामगिरी यांच्या आधारावर गुणांचे सामान्यीकरण केले जाते. सामन्यीकरण करताना विद्यार्थ्याला मिळालेल्या एकंदर गुणांचे रुपांतर 100 ते शून्य अशा एका स्केलमध्ये केले जाते. त्यावरुन कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण या स्केलच्या आधारावर मिळाले, हे घोषित केले जाते.
13 भाषांमध्ये परीक्षा
ही परीक्षा मराठी, आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि ऊर्दू अशा 13 भाषांमध्ये घेतली जाते. ही परीक्षा भारताबाहेरच्या केंद्रांवरही घेतली जाते. कारण या परीक्षेला अनेक विदेशी विद्यार्थीही बसतात. अशीही माहिती प्राधिकरणाने पत्रकारांना दिली आहे.
आणखी एक परीक्षा
या परीक्षेत निवडलेल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षाही द्यावी लागते. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच नंतर आयआयटी आणि या परीक्षांशील सलग्न असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे इंजिनिअर होण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याची आवश्यकता असते, अशीही माहिती देण्यात आली.
Comments are closed.