युद्धाचा भडका! जेट इंधन सहा टक्क्यांनी महागले, हिंदुस्थानातील विमान कंपन्यांच्या नफ्यात घट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचे परिणाम आता वेगवेगळय़ा ठिकाणी जाणवू लागले आहेत. युद्धामुळे विमानांना लागणारे जेट इंधन सहा टक्क्यांनी महाग झाले आहे. मार्च महिन्यात एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ)च्या किमतीत वाढ झाल्याने एअरलाइन्सच्या नफ्यावर याचा थेट परिणाम झाला आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने विमान कंपन्यांना याचा फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे रद्द झाल्याने आणि विमानांना मार्ग बदलावा लागल्याने एअरलाइन्सचा खर्च वाढला आहे.

कोणत्याही एअरलाइन्ससाठी इंधन हा सर्वात मोठा खर्च असतो. एअरलाइन्ससाठी एकूण ऑपरेटिंग खर्चात याचा वाटा 30 ते 40 टक्के असतो. फेब्रुवारी 2026 पर्यंत एटीएफची सरासरी किंमत 91,173 रुपये प्रति किलोलीटर होती; परंतु युद्धाच्या स्पह्टानंतर म्हणजेच मार्च 2026 मध्ये यात 6 टक्क्यांची वाढ होऊन ही किंमत 96,638 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कोविड येण्याआधी याची किंमत केवळ 64,715 रुपये प्रति किलो होती; परंतु या किमतीत वाढ झाल्यानंतर ती कमी झाली नाही. आता मध्यपूर्वेतील तणाव आणि इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये अस्थिरता कायम असल्याने एटीएफच्या किमतीत वाढ झाली आहे.

हवाई बंदमुळे खर्चात वाढ

मध्य पूर्वेतील तणाव आणि पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केल्याने हिंदुस्थानातील एअरलाइन्सला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मार्ग बदलावे लागत आहेत. यामुळे विमानाच्या उड्डाणांचा वेळ वाढल्याने इंधन जास्त लागत आहे. यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका एअर इंडिया, स्पाइसजेट आणि इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर होत आहे. विमान कंपन्यांना यूरोप आणि मध्य पूर्वेतील अनेक मार्गांवरील उड्डाणे रद्द करावी लागल्याने एअरलाइन्सच्या नफ्यात घट झाली आहे.

Comments are closed.