झारखंडचे नेते शिबू सोरेन यांचे निधन झाले

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

झारखंडला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी आंदोलन केलेले आणि झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. गेली काही वर्षे ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. गेला एक महिनाभर ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली, अशी माहिती देण्यात आली. त्यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

शिबू सोरेन हे झुंजार नेते म्हणून ओळखले जात. त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा नामक राजकीय पक्ष आणि संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेने झारखंड प्रदेशाला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी तीन दशके आंदोलन चालविले होते. भारतीय जनता पक्षानेही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. या आंदोलनांना यश येऊन स्वतंत्र झारखंड राज्याची स्थापना 10 नोव्हेंबर 2000 या दिवशी केंद्रातील तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून करण्यात आली.

तीन वेळा मुख्यमंत्री

त्यांच्या राजकीय कार्यकाळात ते तीनवेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांचा एकही कालावधी पूर्ण होऊ शकला नाही. प्रत्येक वेळी ते युतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री बनले होते. पण या युत्या आणि आघाड्या अस्थिर असल्याने त्यांच्या एकाही वेळी मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. ते 2005, 2008 आणि 2009 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. सध्या त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत.

लहान परिचय

शिबू सोरेन यांचा जन्म 11 जानेवारी 1944 या दिवशी सध्याच्या झारखंड राज्याच्या रामगढ नजीकच्या नेम्रा नामक ग्रामी झाला होता. ते संथाल वनवासी समाजातील होते. ग्रामीण भागांमधील वनवासी समुदायांचे जमीनदार आणि सावकारांकडून होणारे शोषण त्यांनी बालपणापासून अनुभवले होते. हे शोषण दूर करण्याच्या ध्येयाने त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी ‘संथाल नवयुवक संघ’ नामक संघटना स्थापन केली होती. या संस्थेने उग्र आंदोलने केली होती. त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी बिनोद बिहारी महातो आणि ए. के. रॉय यांच्यासह झारखंड मुक्ती मोर्चा या संघटनेची आणि राजकीय पक्षाची स्थापना केली होती.

Comments are closed.