शाई लावून बाहेर जायचं अन् आत ती गँग बटण दाबायची; परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान!

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्यामुळे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आले, असे आरोप सातत्याने होत आहेत. विशेषत: बीडमधील परळी मतदारसंघात मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान करण्यात आल्याचे आणि काही ठिकाणी हत्यारे दाखवत दमदाटी करत मतदारांना रोखल्याचे व्हिडीओ समोर आले होते. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (ट्विटर) वर एक व्हिडीओ रिपोर्ट केला असून परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान झाल्याचा आरोप केला आहे.

गजाभाऊन नावाच्या एका एक्स हँडलवरून परळी मतदारसंघातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात गोट्या गीते नावाचा एक व्यक्ती ईव्हीएम मशीनवरून घड्याळ चिन्हापुढील बटण दाबून धनंजय मुंडे यांना मतदान करताना दिसत आहे. गोट्या गीतेचा अजून एक कारनामा, मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने टाकलेला आहे. तुम्ही स्पष्ट बघू शकता की त्याच्याबरोबर अजून कोणीतरी बाजूला मतदान करत आहे. हे बूथ कॅप्चर नसेल का? असा सवाल गजाभाऊने उपस्थित केला.

गजाभाऊची ही पोस्ट रिपोस्ट करत जितेंद्र आव्हाड बूथ ताब्यात घेऊन मतदान केल्याचा आरोप केला आहे. परळी मतदार संघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. शाई लावायची आणि बाहेर जायचे… मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचे बटण दाबण्याचे काम ही गँग करायची. पोलिसांसमोर हा सगळा ट्रान्सपरंट कारभार सुरू होता, असे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले. मतदान केंद्राचे काही व्हिडीओ देखील आहेत. परंतु, याला कोण काय करणार, हे कायद्याचे राज्य आहे. पुढे कोणाला कंत्राट द्यायचे असेल तर त्यांनी वाल्मीक कराडशी संपर्क साधावा, असे आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.