वाल्मीक कराडमुळे खुनी आरोपी मोकाट, न्याय मिळवून देण्याची आव्हाड यांची मागणी

परळी तालुक्यात महादेव मुंडे यांचा खून झाला होता. पण वाल्मीक कराडमुळे त्यातले खरे आरोपी मोकाट आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, परळी तालुक्यातील महादेव मुंडे यांचा खुन 14 महिन्यांपुर्वी झाला आहे. त्यातील आरोपी तात्कालीन पी.आय रवी सानप यांनी शोधले होते, मात्र वाल्मीक कराड याने खरे आरोपी अटक करण्या ऐवजी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांना आरोपी करण्यासाठी पोलीसांवर दबाव टाकला होता.
तसेच रवी सानप यांनां खरे आरोपी माहित आसल्या मुळे राजाभाऊ फड यांना आरोपी करण्यास नकार दिला. त्यामुळे रवी सानप यांची बदली वाल्मिकने केली असून, आज पर्यंत महादेव मुंडे यांचा खुन करणारे आरोपी परळीत उघड फिरत आहेत. गेल्या 14 महिन्यांपासून महादेव मुंडे यांचे कुटुंब न्यायासाठी पोलीसांचे ऊंबरठे झिजवत आहेत. न्यायासाठी दारोदार भटकणाऱ्या महादेव मुंडेच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

Comments are closed.