Jitendra Awhad was angry over statement made by Suresh Dhas in Somnath Suryavanshi case


मुंबई : राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणावरून विविध ठिकाणी मोर्चे निघत आहात. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे, अशी जनभावना आहे. तर काही राजकारणी सुद्धा या न्यायाच्या लढ्यात उतरलेले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करणारे आमदार सुरेश धस हे सोमनाथ सूर्यंवशी यांच्या मृत्यू प्रकरणातील पोलिसांना माफ करावे, असे म्हणत आहेत. पण त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे, असे आव्हाडांनी म्हटले आहे. (Jitendra Awhad was angry over statement made by Suresh Dhas in Somnath Suryavanshi case)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X या सोशल मीडिया साइटवर आमदार सुरेश धस यांनी एका मोर्चात केलेल्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसोबत पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, “दुसर्‍याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्‍याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्‍यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा – त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही.” असे आव्हाडांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

हेही वाचा… Manipur : आता तरी मणिपूरचा दौरा करा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

तर, “ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे.” असा टोला आमदार आव्हाड यांनी लगावला आहे. तसेच, “सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे… अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही.” असेही आव्हाडांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून स्पष्टपणे म्हटले आहे.

सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा. त्याच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. याचसाठी निघालेल्या लाँगमार्चमध्ये भाजपा आमदार सुरेश धस सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सोमनाथच्या प्रकरणातील पोलिसांची सरकारकडून कानउघडणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर गुन्हेच दाखल करण्यात यावे, अशी मागणी लावून धरू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. तसेच, जसे काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ केले जाते, तसे तुम्हीही त्यांना काही गोष्टींमध्ये माफ करावे, असे धस यांच्याकडून सांगण्यात आले. धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हा परभणीहून निघालेला लाँग मार्च हा नाशिकमध्ये स्थगित झाला. ज्यामुळे आता धस यांनी केलेल्या विधानामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासंदर्भातील प्रकरण तापण्याची शक्यता आहे.





Source link

Comments are closed.