जोफ्रा आर्चरने पंजा उघडला, पण तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत

अ‍ॅडिलेडमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पाच विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली असली, तरी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये ज्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे दर्शन ऑस्ट्रेलियाने घडवले होते, तोच खेळ कांगारू संघाने या सामन्यातही कायम ठेवला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 371 धावांचा मजबूत स्कोर उभारला असून, इंग्लंडला पहिल्या डावात अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. त्यामुळे या सामन्यावरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून येत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि लवकर विकेट्स गेल्याने ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडला. अशा परिस्थितीत विकेटकीपर-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीने जबाबदारी स्वीकारत शानदार शतक झळकावले. कॅरीने 106 धावांची झुंजार खेळी करत संघाला सावरले.

कॅरीसोबतच उस्मान ख्वाजानेही 82 धावांची दमदार खेळी केली. विशेष म्हणजे, हा सामना स्टीव्ह स्मिथ ऐवजी ख्वाजाला खेळण्याची संधी मिळाली होती, कारण सामना सुरू होण्याच्या अगदी आधी स्मिथ अनफिट ठरला होता. मिचेल स्टार्कने खालच्या फळीतून 54 धावांची उपयुक्त खेळी करत इंग्लंडवर दडपण आणखी वाढवले. जोश इंग्लिसनेही 32 धावांचे योगदान दिले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 371 धावांवर संपुष्टात आला.

इंग्लंडकडून दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात जोफ्रा आर्चर याने भन्नाट गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. त्याला ब्रायडन कार्स आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली. मात्र ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केल्यानंतर इंग्लंडची फलंदाजी फारशी टिकू शकली नाही. संघाची सुरुवात आशादायक वाटत असतानाच 37 धावांवर पहिला विकेट गेला आणि पुढील पाच धावांत आणखी दोन विकेट्स पडल्याने इंग्लंड अडचणीत आला.

इंग्लंडने मालिकेतील पहिले दोन सामने आधीच गमावले आहेत. जर हा तिसरा कसोटी सामना देखील पराभवात गेला, तर इंग्लंडला 0-3 ने अ‍ॅशेस मालिका गमवावी लागणार आहे. जरी त्यानंतर दोन सामने शिल्लक राहतील, तरी मालिकेच्या निकालावर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे इंग्लंडसाठी या सामन्यातून दमदार पुनरागमन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.