‘मारिया आयपीएस’साठी जॉन अब्राहमचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; राकेश मारियांसाठी बदलणार संपूर्ण शरीरयष्टी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या आगामी ‘मारिया आयपीएस’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम राकेश मारिया यांची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या सुमारे 40 वर्षांच्या पोलीस कारकीर्दीतील विविध टप्पे पडद्यावर साकारण्यासाठी जॉन आपल्या शरीरयष्टीत मोठे बदल करणार असल्याचे वृत्त आहे.

‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ‘मारिया आयपीएस’मध्ये राकेश मारिया यांच्या विशीपासून ते साठीपर्यंतच्या आयुष्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे जॉन अब्राहमला चित्रपटात वेगवेगळ्या वयातील व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे. राकेश मारिया यांच्या विशी आणि तिशीतील काळासाठी जॉनने शरीरयष्टी अधिक मजबूत करण्यासाठी स्नायू कमावले आहेत. या भूमिकेसाठी त्याने बल्क-अप लूक धारण केला आहे. मात्र, व्यक्तिरेखेच्या पुढील वयातील टप्प्यांसाठी त्याला पुन्हा शरीरयष्टीत बदल करावा लागला आहे.

राकेश मारिया यांच्या पन्नाशीच्या उत्तरार्धातील आणि साठीतील काळासाठी जॉन वजन कमी करून अधिक सडपातळ आणि फिट दिसणार आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी त्याचा ‘लीनर लूक’पाहायला मिळणार आहे. जॉनने यापूर्वी कोणत्याही चित्रपटासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या वयांनुसार शरीरयष्टीत बदल केल्याचे पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे ‘मारिया आयपीएस’मधील त्याचा हा लूक चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

‘मारिया आयपीएस’च्या काही महत्त्वाच्या भागांचे चित्रीकरण मुंबईतील विविध ठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये वेस्टर्न रेल्वेच्या परिसराचाही समावेश आहे. जॉन अब्राहमने चर्चगेट येथील वेस्टर्न रेल्वे मुख्यालयासह लोअर परळ आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवरही चित्रपटाची दृश्ये शूट केल्याचे वृत्त आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला जुलै 2025 मध्ये सुरुवात झाली होती. सुरुवातीचे काही शूटिंग मुंबईजवळील एलोरा स्टुडिओमध्ये करण्यात आले. येथे चित्रपटासाठी पोलीस ठाण्याचा सेट उभारण्यात आला होता. जॉन अब्राहम आणि रोहित शेट्टी यांनी या सेटवर पोलीस चौकशी तसेच नाट्यमय प्रसंगांचे चित्रीकरण केले.

राकेश मारिया यांच्या प्रदीर्घ पोलीस कारकीर्दीतील विविध टप्पे, त्यांच्या तपासाची पद्धत आणि मुंबई पोलिसांमधील त्यांचा प्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रोहित शेट्टी आणि जॉन अब्राहम यांची ही जोडी प्रेक्षकांसाठी किती प्रभावी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.