कोलकातामध्ये संयुक्त कमांडर्सची परिषद सुरू होते

पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्घाटन : परिषदेत तीन दिवस देशाच्या सुरक्षेवर चर्चा होणार

वृत्तसंस्था/ कोलकाता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोलकाता येथे 16 व्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्सचे (सीसीसी) उद्घाटन केले. ही परिषद 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान सैन्याच्या पूर्व कमांडचे मुख्यालय असलेल्या फोर्ट विल्यम कोलकाता येथे आयोजित करण्यात आली आहे. या वर्षीची थीम ‘सुधारणांचे वर्ष : भविष्यासाठी परिवर्तन’ अशी आहे. यावर्षी परिषदेचे हे 16 वे वर्ष आहे. या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी कोलकाता येथे पोहोचले होते. गेल्या एका महिन्यात हा त्यांचा दुसरा बंगाल दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोलकाता येथील विजय दुर्ग (पूर्वीचे फोर्ट विल्यम) येथील भारतीय सैन्याच्या पूर्व कमांड मुख्यालयात तीन दिवसांच्या संयुक्त कमांडर्स परिषदेचे (सीसीसी) उद्घाटन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची ही पहिलीच परिषद असल्यामुळे यंदाच्या कॉन्फरन्सला विशेष महत्त्व आहे.

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स हे सुरक्षा दलासाठी सर्वात मोठे चर्चेचे व्यासपीठ मानले जाते. यामध्ये लष्करी अधिकारी आणि सरकारी मंत्री देशाच्या सुरक्षा आणि रणनीतीवर चर्चा करतात. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख त्यात सहभागी होत असल्यामुळे त्यात देशाच्या सुरक्षेविषयीची सखोल चर्चा होत असते. यंदाच्या परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोवाल, सीडीएस जनरल अनिल चौहान आणि मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी परिषदेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स (सीसीसी) हा भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा सर्वात मोठा धोरणात्मक मंच आहे. संरक्षण आव्हाने, आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्ध-तयारी यावर विचार करण्यासाठी सैन्य आणि सरकारी मंत्र्यांना एकत्र आणणे हा या परिषदेचा उद्देश आहे. देशाचे सुरक्षा धोरण बनविण्यात ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावते. यापूर्वी शेवटची परिषद 2023 मध्ये भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती.

Comments are closed.