तिन्ही सेवा प्रमुखांचे 'संयुक्त' पुनरावलोकन

दिल्लीतील तीन दिवशीय परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिलीच बैठक

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील भूसेना, नौदल आणि वायुदल या तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी मंगळवारी संयुक्त कारवायांवर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी भविष्यातील युद्ध परिस्थितीत एकात्मिक समुद्री आणि हवाई युद्धाच्या संयुक्त कारवायांबद्दलचा आढावा घेण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये पहिल्या दिवशी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तिन्ही दलांनी संपूर्ण ऑपरेशन समन्वयाने पार पाडले होते. संपूर्ण ऑपरेशन दरम्यान, तिन्ही दलांचे कमांडर एकमेकांशी जोडलेले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच दिल्लीतील परिषदेत लष्कराचे सर्व कमांडर एकत्र आले आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी हे सुद्धा या तीन दिवसीय परिषदेत कमांडर्सना वेगवेगळ्या सूचना करतील.

तिन्ही सेनाधिकाऱ्यांनी तिन्ही दलांमधील समन्वयासाठी आपला संकल्प मांडताना भविष्यात संयुक्त ऑपरेशन्सचे नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. युद्ध परिस्थितीत एकात्मिक सागरी आणि हवाई युद्धाबाबतही या परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून सध्या पाकिस्तानशी युद्धविराम आहे. पाकिस्तानकडून पहलगाम हल्ल्यासारखी घटना पुन्हा घडली तर युद्धविराम संपेल, असे भारत सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

तीन दिवसांचे विचारमंथन

7 ते 9 जुलै या कालावधीत राजधानी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत सैन्याच्या सातही कमांडचे कमांडर उपस्थित आहेत. आर्मी कमांडर कॉन्फरन्स वर्षातून दोनदा आयोजित केली जाते, परंतु ही बैठक त्यापेक्षा वेगळी आहे. या परिषदेसंबंधीची माहिती सैन्याने आधी शेअर केली नव्हती. ही बैठक ऐनवेळी आयोजिण्यात आली.

पश्चिम सीमेवरही सैन्याची सुसज्जता

एकीकडे दिल्लीत विचारमंथन सुरू असताना दुसरीकडे ऑपरेशनची तयारी सुरू आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर जलद सराव सुरू आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणत्या कमांडला कोणती जबाबदारी कधी मिळेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सर्व कमांड आपापल्या सुसज्जतेमध्ये व्यग्र आहेत. या भागात, लष्कराच्या दक्षिण कमांडने अलीकडेच राजस्थानमध्ये आपल्या अग्निशक्तीची चाचणी घेतली. यामध्ये टँक, तोफखाना तोफा, मल्टीबॅरल रॉकेट लाँचर ग्रॅड, पिनाका, बीएमपी आणि ड्रोन पॉवरच्या लढाऊ तयारीसाठी कवायती घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे, पश्चिम कमांडने गगन विजय सराव केला. आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी या सरावाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे हा संपूर्ण सराव सैन्याने बनवलेल्या सशस्त्र ड्रोनच्या अचूक सरावावर आधारित होता.

 

Comments are closed.