IND vs AUS: भारताविरुद्ध उर्वरित मालिकेत जोश हेजलवूड खेळणार नाही? अभिषेक शर्माचा मोठा खुलासा समोर!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 125 धावांवर गारद झाला. यामागचं मोठं कारण म्हणजे पॉवरप्लेमध्ये 4 बळी गमावणं. पॉवरप्लेमध्येच जोश हेजलवुडने (Josh hazelwood) एकट्याने 3 विकेट घेतल्या. त्याने एकूण 4 षटकांत फक्त 13 धावा देत भेदक मारा केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 विकेटने जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत जेव्हा अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) सांगण्यात आलं की, जोश हेजलवुड पुढील सामन्यांमध्ये खेळणार नाही, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला.
अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा (Abhishek Sharma & Harshit Rana) यांना सोडून इतर कोणताही भारतीय फलंदाज दहाच्यावर धावा करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर सगळे फलंदाज अडचणीत सापडले, पण अभिषेक मात्र 200 च्या आसपासच्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करत होता. त्याने 37 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या.
जोश हेजलवुडबद्दल अभिषेक शर्माने सामन्यानंतर म्हटलं, मी त्याला वनडे मालिकेतून पाहत होतो. माहित होतं की तो आमच्यासाठी आव्हान निर्माण करणार आहे. आज त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याच्याविरुद्ध खेळणं कठीण होतं. मी त्याच्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न केला, पण त्याचे स्वतःचे प्लॅन होते आणि तो ते उत्तमरीत्या अंमलात आणत होता. माझ्यासाठीही हा अनुभव वेगळा होता.
जेव्हा पत्रकाराने त्याला सांगितलं की हेजलवुड पुढील तीन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही, तेव्हा अभिषेक म्हणाला, असं आहे का? मला माहित नव्हतं, पण जर असं असेल तर थोडा दिलासा मिळेल. तो तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो, पण फलंदाज म्हणून तुम्हाला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करायला शिकावं लागतं, आणि मी त्याचाच प्रयत्न करत आहे.
जोश हेजलवुडला या मालिकेतील पहिले दोन टी-20 सामने खेळवण्यात आले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेटने जिंकला. हेजलवुड आता आगामी अॅशेस मालिकेची तयारी करणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी-20 सामना रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी बेलरीव ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.
 
			 
											
Comments are closed.