लग्नाचं कारण देऊन रिलीज, 8.6 कोटी मिळताच चित्र बदललं? जोश इंग्लिसच्या निर्णयाकडे IPL जगताचं लक्ष
IPL 2026 च्या लिलावाआधी जोश इंग्लिसला पंजाब किंग्सने रिलीज केलं, कारण पुढील हंगामात त्याची उपलब्धता अत्यंत मर्यादित असेल, अशी माहिती संघ व्यवस्थापनाला देण्यात आली होती. इंग्लिस पुढील सीझनमध्ये खेळलाच तर काही मोजके सामने खेळून तो मायदेशी परत जाईल, असं PBKS ला वाटत होतं. मात्र, लिलावात घडलेला प्रकार पाहता आता या संपूर्ण प्रकरणात गोंधळ निर्माण झाला आहे.
IPL 2026 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन विकेटकीपर-फलंदाज जोश इंग्लिसवर मोठी बोली लागली. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला तब्बल 8.6 कोटी रुपयांत खरेदी केलं. विशेष म्हणजे, बीसीसीआयकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं की इंग्लिस पुढील सीझनमध्ये केवळ चार सामन्यांसाठीच उपलब्ध असेल. तरीही इतकी मोठी बोली लागल्यामुळे लीगमधील काही संघांमध्ये नाराजी आणि प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, पंजाब किंग्सचे अधिकारी या घडामोडींमुळे नाराज आहेत. इंग्लिसने स्वतः मर्यादित उपलब्धतेची माहिती दिल्यामुळेच त्याला शेवटच्या क्षणी रिलीज करण्यात आलं होतं. PBKS ने 15 नोव्हेंबर रोजी, रिटेन्शन डेडलाईनच्या अवघ्या 45 मिनिटे आधी, बीसीसीआयला इंग्लिसच्या रिलीजची माहिती दिली होती. आता मात्र संघाला वाटत आहे की त्यांना पूर्ण माहिती देण्यात आलेली नव्हती.
या रिपोर्टमध्ये पुढे असंही नमूद करण्यात आलं आहे की जोश इंग्लिसने पंजाब किंग्सला आपल्या लग्नाबद्दल माहिती दिली होती. त्याचं लग्न 18 एप्रिलला असून, त्यानंतर तो हनीमूनसाठी जाणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे तो मे महिन्याच्या शेवटी फक्त 10 ते 14 दिवसांसाठीच उपलब्ध असेल, असं त्याने स्पष्ट केलं होतं. याच आधारावर PBKS ने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
मात्र लिलावानंतर चित्र बदलताना दिसत आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात इंग्लिससाठी जोरदार बिडिंग वॉर पाहायला मिळाला आणि अखेर लखनऊने त्याला 8.6 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. यानंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की इंग्लिस आपल्या हनीमूनचे प्लॅन पुढे ढकलू शकतो आणि सीझनच्या सुरुवातीलाच IPL मध्ये सहभागी होऊ शकतो.
SRH चे बॉलिंग कोच वरुण आरोन यांनीही यावर भाष्य करताना, वैयक्तिक कारणांमुळे घेतलेले निर्णय बदलू शकतात, असं सांगितलं. तर LSG चे कोच जस्टिन लॅंगर आपल्या खेळाडूसोबत सातत्याने संपर्कात असल्याचंही कळतंय.
गेल्या हंगामात इंग्लिसचा फॉर्म फारसा प्रभावी नव्हता. 11 सामन्यांत त्याने 278 धावा केल्या होत्या, मात्र महत्त्वाच्या सामन्यांत त्याने निर्णायक कामगिरी केली होती. जर त्याची उपलब्धता स्पष्ट असती, तर PBKS ने नक्कीच त्याला रिटेन केलं असतं. पण आता 8.6 कोटींच्या बोलीनंतर इंग्लिसचं मन बदलल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.
Comments are closed.