प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त अयोध्येत जल्लोष

रामलल्लाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा उत्सव, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याला शनिवारी हिंदू कॅलेंडरनुसार एक वर्ष पूर्ण झाले. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यासाठी तीन दिवस विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 11 ते 13 जानेवारी असे तीन दिवस चालणार असून सध्या अयोध्येत आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघही वाढलेला दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेल्या रामलल्लाच्या पहिल्या जयंतीनिमित्त शनिवारपासून तीन दिवसांचा उत्सव सुरू झाला आहे. तसेच देशात अन्यत्रही राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलल्लाचा महाभिषेक करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच कॅम्पसमधील अंगद टेकडीवरून संतांना आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भविकांना संबोधित केले. याप्रसंगी दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

मागीलवर्षी 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले. यावर्षी हा उत्सव पौष शुक्ल द्वादशी तिथीला 11 जानेवारी रोजी सुरू होत आहे. ही तारीख विशिष्टपणे निश्चित केल्यामुळे इतर प्रमुख हिंदू सण तारखेनुसार पाळले जातात, त्याचप्रमाणे ही जयंती साजरी केली जात आहे. याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 11 ते 13 जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती. पहिल्या दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले असून संगीत, कला आणि साहित्य क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार आपले सादरीकरण करतील. ट्रस्टच्यावतीने मुख्य अभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होते. हा सोहळा सकाळी पार पडल्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमही सुरू झाले आहेत.

उत्सवाचे वातावरण

राम मंदिर संकुलात विशेष कार्यक्रम होतील, परंतु उत्सवाचे वातावरण केवळ मंदिरापुरते मर्यादित राहिलेले नाही. संपूर्ण अयोध्येत सर्वत्र धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. याशिवाय, जास्तीत जास्त लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता यावे म्हणून या ऐतिहासिक प्रसंगाचे थेट प्रक्षेपण देखील केले जात आहे. राम मंदिराच्या या खास प्रसंगी जगभरातील भाविक अयोध्येत पोहोचतील आणि या ऐतिहासिक क्षणाचा भाग होतील. हा सण केवळ हिंदू धर्माच्या अनुयायांसाठीच महत्त्वाचा नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष या कार्यक्रमावर आहे.

Comments are closed.