जॉय मल्या बागची आता सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे
यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सेवा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदावर कार्यरत असलेले जॉयमाल्या बागची यांची सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांचे नाव 6 मार्च रोजी प्रस्तावित केले होते. कॉलेजियमने केंद्र सरकारला न्यायमूर्ती बागची यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सोमवारी त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून बागची यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. न्यायमूर्ती बागची यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एकूण 33 न्यायाधीश असतील, तर एकूण मंजूर पदे 34 आहेत.
न्यायमूर्ती बागची हे सर्वोच्च न्यायालयात सहा वर्षांहून अधिक काळ काम करतील. या काळात त्यांना भारताचे सरन्यायाधीश होण्याची संधीही मिळणार आहे. ते 2 ऑक्टोबर 2031 रोजी निवृत्त होतील, त्यापूर्वी ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होतील. 25 मे 2031 रोजी न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन मुख्य न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती बागची हे भारताचे मुख्य न्यायाधीश होतील.
27 जून 2011 रोजी न्यायमूर्ती बागची यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 4 जानेवारी 2021 रोजी त्यांची आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात बदली झाली. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2021 रोजी ते पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात परतल्यापासून तिथेच सेवा देत आहेत. न्यायमूर्ती बागची यांनी 13 वर्षांहून अधिक काळ उच्च न्यायालयात काम केले आहे.
Comments are closed.