एनटीएला भेट देण्यासाठी न्यायाधीश
नीट-युजी’ सुनावणीत मनोदय केला व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ‘राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणा’च्या कार्यालयाला भेट देतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ‘नीट-युजी’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणाच्या सुनावणी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने हा मनोदय व्यक्त केला आहे. हे कार्यालय दिल्लीतील ‘मिंटो मार्ग’ येथे आहे. या कार्यालयाचे कामकाज कसे चालते, प्रवेश परीक्षा सुयोग्यपणे घेण्यासाठी कार्यालयाने कोणती उपाययोजना केली आहे, तसेच प्रस्ताविक सुधारणा किती प्रमाणात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, याचे परीक्षण या भेटीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश करतील, असे स्पष्ट केले गेले.
न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. अलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी केली जात आहे. या संबंधातील याचिका अखिल भारतीय वैद्यकीय संघटना मंडळ (एफएआयएमए) आणि एकत्रित डॉक्टर आघाडी (युडीएफ) या संघटनांनी सादर केल्या आहेत. एनटीएमध्ये सर्वंकष रचनात्मक आणि संस्थात्मक सुधारणा केल्या जाण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी या याचिकांमध्ये आहे.
तुषार मेहता यांचा युक्तीवाद
एनटीएच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकारणात दूरगामी सुधारणा करण्यासाठी सुप्रसिद्ध तंत्रज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वात उच्चाधिकार कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृतीदलाने डॉ. के. राधाकृष्णन यांच्या नेत्वृत्वात स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीशी या सुधारणांच्या संदर्भात व्यापक चर्चा केली आहे. निलेकणी यांच्या नेतृत्वातील कृती दल लवकरच आपला प्राथमिक अहवाल सादर करणार आहे. तो अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोरही ठेवण्यात येईल. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतचा कालावधी देण्यात यावा, अशी विनंती मेहता यांनी केली आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करा
या कृतीदलात केंद्र सरकारचे एक सहसचिव समाविष्ट आहेत. त्यांनी कृतीदलाच्या अहवालात कोणत्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांची नोंद असणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाला सादर करावे, असा आदेश खंडपीठाने दिला. ही संपूर्ण कृती केवळ सूचना करण्यापुरतीच मर्यादित राहू नये. केलेल्या सूचना प्रत्यक्षात आणल्या जात आहेत की नाहीत, यावर लक्ष ठेवण्याचीही आवश्यकता आहे. तसेच या सूचनांच्या कार्यान्वयनामुळे व्यवस्थेत कोणती सुधारणा झाली, याचे अवलोकन करण्याचीही तितकीच आवश्यकता आहे. या सर्व उपाययोजनांमुळे राष्ट्रीय परीक्षा प्राधिकारणाचे संस्थात्मक सबलीकरण किती प्रमाणात झाले, हे न्यायालयाच्या निदर्शनास आले पाहिजे, अशी टिप्पणी न्या. नरसिम्हा यांनी सुनावणीच्या प्रसंगी करुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
कार्यालयाला भेट देण्याचा मानस
एनटीएचे कार्यालय मिंडो मार्ग येथे आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायाधीशांनी या कार्यालयाला भेट देण्याची आणि त्याचे कामकाज कसे चालते, याची पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या इच्छेचे स्वागत केले. न्यायाधीशांनी स्वत: पाहणी केली, तर केंद्र किती गांभीर्याने प्रयत्न करीत आहे, हे त्यांच्या लक्षात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्थायी तज्ञ नियुक्त व्हावा
एनटीएचे कामकाज स्थायी पद्धतीने योग्यरित्या चालायचे असेल, ते केवळ प्रतिनियुक्त (डेप्युटेड) अधिकाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. एनटीएमध्ये स्थायी स्वरुपात काम करणाऱ्या तज्ञांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. असे तज्ञ नियुक्त केल्यास ते सातत्याने हेच काम करत राहतील आणि प्राधिकरणाच्या कार्याला त्यामुळे बळ प्राप्त होईल, अशी महत्वाची सूचनाही न्या. नरसिम्हा यांनी प्राधिकरणाला केली. ती सूचना मान्य केली जाण्याचा संभव आहे.
प्राधिकरणात स्थायी तज्ञ आवश्यक
ड राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाच्या कामकाजासंबंधात न्यायालयाच्या काही सूचना
ड प्राधिकरणात स्थायी तज्ञांची नियुक्ती आवश्यक, कामकाजाचा आढावा हवा
ड उच्चाधिकार कृती दलाच्या सूचनांसंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश
ड केवळ सूचना नव्हेत, तर त्यांच्या कार्यान्वयनावर भर देण्याचीही आवश्यकता
Comments are closed.