न्यायाधीशांनी वास्तविक भारतीय कोण आहे हे ठरवू नये!
सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर प्रियांका वड्रा यांची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनसंबंधी भारताच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींच्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना सल्ला मिळाला आहे. अशा स्थितीत त्यांच्या भगिनी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा राहुल यांच्या समर्थनार्थ सरसावल्या आहेत. प्रियांका यांनी खरा भारतीय विषयक न्यायालयाच्या टिप्पणीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
माननीय न्यायाधीशांचा पूर्ण आदर राखत मी खरा भारतीय कोण हे न्यायाधीश निश्चित करू शकत नसल्याचे म्हणू इच्छिते, असे वक्तव्य काँग्रेस महासचिव प्रियांका वड्रा यांनी मंगळवारी संसद परिसरात केले आहे. सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. माझा भाऊ राहुल गांधी कधीच सैन्याच्या विरोधात बोलणार नाही, सैन्याबद्दल त्याच्या मनात आदर आहे. राहुल यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा प्रियांका यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राहुल गांधी यांना एका वक्तव्याप्रकरणी फटकारत खरा भारतीय अशाप्रकारचे वक्तव्य करू शकत नसल्याची टिप्पणी केली होती. सैन्यासंबंधी राहुल यांनी केलेल्या टिप्पणीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. चीनने भारताच्या 2 हजार चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केल्याचे कसे कळले हे राहुल गांधी यांनी सांगावे असेही न्यायालयाने म्हटले होते.
16 डिसेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. लोक भारत जोडो यात्रेविषयी विचारतील, परंतु चीनने 2000 चौरस किलोमीटरच्या भारतीय भूभागावर कब्जा केला, 20 भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले आणि आमच्या सैनिकांना अरुणाचल प्रदेशात मारहाण होतेय, त्याविषयी लोक बोलत नसल्याचे राहुल यांनी म्हटले होते.
राहुल गांधी हे कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारची वक्तव्यं का करत आहेत? जर ते खरे भारतीय असतील तर अशाप्रकारची वक्तव्यं करणार नाहीत अशी टिप्पणी न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी केली होती. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी तीन आठवड्यांपर्यंत स्थगित केली आहे.
Comments are closed.