ग्लेन मॅक्सवेल फक्त एक विकेट घेताच इतिहास रचणार! आजवर फक्त तीन खेळाडूंनीच केली आहे ही कामगिरी

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकामधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे, त्यामुळे हा शेवटचा सामना मालिकेचा निकाल ठरवणारा ठरणार आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलकडे (Glenn Maxwell) सर्वांचे लक्ष असेल, कारण तो एक खास विक्रम आपल्या नावे करू शकतो. शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष असेल. त्याच्या स्पिन गोलंदाजीमुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळू शकतो.

जर तिसऱ्या टी-20 मध्ये मॅक्सवेलने एक विकेट घेतली, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मधील एकूण 50 विकेट्स पूर्ण होतील. तसेच, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 50 विकेट्स आणि 2,500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरेल. मॅक्सवेलने आतापर्यंत 123 टी-20 सामन्यांमध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतके ठोकत 2,771 धावा केल्या आहेत आणि 49 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आतापर्यंत 50 विकेट्स आणि 2,500 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू म्हणजे शाकिब अल हसन, मोहम्मद हफीज आणि वीरनदीप सिंह.

बांगलादेशचे माजी कर्णधार शाकिब अल हसन यांनी 2006 ते 2024 दरम्यान 129 टी-20 सामन्यांत 2,551 धावा केल्या असून 149 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानचे माजी कर्णधार मोहम्मद हफीज यांनी 2006 ते 2021 दरम्यान 119 सामन्यांत 2,514 धावा करत 61 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मलेशियाचा वीरनदीप सिंह आहे. त्याने 2019 ते 2025 दरम्यान खेळलेल्या 102 सामन्यांत 3,013 धावा करत 97 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकामधील शनिवारी होणारा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने टिम डेविडच्या (Tim David) तडाखेबाज अर्धशतकाच्या जोरावर जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी डेवाल्ड ब्रेविसने धमाकेदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात या दोघांच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.

Comments are closed.