न्यायमूर्ती सूर्यकांत हे पुढील सरन्यायाधीश असतील

केंद्र सरकारकडून नियुक्तीची प्रक्रिया सुरू : विद्यमान सरन्यायाधीश नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

देशाचे आगामी सरन्यायाधीश नियुक्त करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने गुरुवारी सुरू केली. विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे 23 नोव्हेंबर रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव निश्चित करण्यासंबंधीचे पत्र सरन्यायाधीश गवई यांना पाठवले जाण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. आता न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी पुढील सरन्यायाधीश होतील आणि 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत सुमारे 15 महिने या पदावर राहतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

भारताच्या सरन्यायाधीश पदावर होणारी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाने करावी लागते. सेवाज्येष्ठतेनुसार सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींना हे पद भूषविण्यासाठी योग्य मानले जाते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती बदली आणि पदोन्नतीचे मार्गदर्शन करणाऱ्या कागदपत्रांच्या संचानुसार सरन्यायाधीश पदासाठी प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया महिनाभर अगोदर सुरू होते, अशी माहिती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिली.

केंद्रीय कायदा मंत्री योग्यवेळी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीशांची शिफारस घेतील. पारंपारिकपणे हे पत्र सध्याचे सरन्यायाधीश वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होण्याच्या एक महिना आधी पाठवले जाते. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताच्या सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असून ते भारतीय न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठी आघाडीवर आहेत.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांची कारकीर्द

सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1981 मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. 1984 मध्ये रोहतक येथील महर्षि दयानंद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर हिसार जिल्हा न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. 1985 मध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करण्यासाठी चंदीगडला गेले. त्यांनी घटनात्मक, सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये विशेषज्ञता प्राप्त केली. कायदे अभ्यासासोबतच त्यांनी अनेक विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, बँका आणि उच्च न्यायालयाचे प्रतिनिधित्वही केले. 7 जुलै 2000 रोजी हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर मार्च 2001 मध्ये वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. 9 जानेवारी 2004 रोजी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून बढती होईपर्यंत त्यांनी हरियाणाचे महाधिवक्ता पद भूषवले. 24 मे 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झालेले सूर्यकांत 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील.

Comments are closed.