30 चेंडू, 0 धावा, 5 विकेट्स… जस्टिन ग्रीव्हजने रचला विश्वविक्रम, पाकिस्तान गारद
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्हजने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास घडवला. त्याने पाकिस्तानविरुद्ध असा विक्रम नोंदवला जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडला नव्हता. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये, जस्टिनने सलग पाच मेडन ओव्हर्स टाकल्या, ज्यात त्याने प्रत्येक षटकात एक विकेट घेतला. परिणामी, कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच मेडन ओव्हर्समध्ये पाच विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला.
त्याच्या आधीच्या स्पेलमध्ये, ग्रीव्हजने सहा षटकांत 27 धावा दिल्या होत्या (ज्यात एका मेडनचा समावेश होता). शिवाय, त्याला एकही बळी मिळाला नव्हता. मात्र, दुसऱ्या स्पेलमध्ये तो पाकिस्तानी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. याचा परिणाम असा झाला की, भक्कम सुरुवात होऊनही पाकिस्तानचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
शान मसूद हा जस्टिन ग्रीव्हजच्या घातक गोलंदाजीचा पहिला बळी ठरला. मसूद 109 धावांवर खेळत असताना ग्रीव्हजने त्याला बाद केले. त्यानंतर त्याने आमेर जमालला अवघ्या 3 धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात, त्याने अली उस्मानला खातेही उघडू न देता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
त्यानंतरच्या षटकात ग्रीव्हजने मोहम्मद रिझवानला 12 धावांवर बाद केले. त्याचा पाचवा बळी मोहम्मद अब्बास ठरला, ज्यालाही एकही धाव काढता आली नाही. अशा प्रकारे, आपल्या दुसऱ्या स्पेलमधील सलग पाच षटकांत त्याने प्रत्येक षटकात एक बळी घेतला आणि एकही धाव दिली नाही.
जस्टिन ग्रीव्हजच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा पहिला डाव 282 धावांवर आटोपला. याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 3 बाद 199 अशी होती. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 311 धावा केल्या होत्या. मात्र, यजमान संघाची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 126 धावांत 7 बळी गमावले. परिणामी, वेस्ट इंडिजची आघाडी 155 धावांपर्यंत पोहोचली आहे.
Comments are closed.