ज्योती मल्होत्राचा कोठडी वाढविली

वृत्तसंस्था/चंदीगड

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली हरियाणाची युट्युबर ज्योति मल्होत्राला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने ज्योतिची पोलीस कोठडी 4 दिवसांनी वाढविली आहे. हिसार पोलिसांनी ज्योतिला गुरुवारी सकाळी 9.30 वाजता न्यायालयासमोर हजर केले, यावेळी दीड तासांपर्यंत तिच्या कोठडीसंबंधी युक्तिवाद झाले. ज्यानंतर ज्योतिच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. तर यावेळी ज्योतिला तिचे पिता हरीश मल्होत्रांना भेटण्याचीही अनुमती नाकारण्यात आली. ज्योतिला 16 मे रोजी अटक करण्यात आली होती. एनआयए, आयबी आणि मिलिट्री इंटेलिजेन्सने देखील ज्योति मल्होत्राची कसून चौकशी केली आहे. बुधवारी कुठल्याही राष्ट्रीय यंत्रणेने चौकशी न केल्याने पोलिसांनीच ज्योतिला अनेक प्रश्न विचारले. तपास अधिकारी निर्मला यांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यापासून पाकिस्तानच्या तीनवेळा केलेल्या प्रवासाविषयी माहिती ज्योतिकडून जाणून घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर ज्योतिने तयार केलेल्या व्हिडिओविषयी चौकशी करण्यात आली.

मिळाला नाही वकील

ज्योतिच्या वतीने अद्याप खटला लढविण्यासाठी कुठलाही वकील नियुक्त करण्यात आलेला नाही. माझ्याकडे वकील नेमण्यासाठी पैसे नाहीत. 5 दिवसांपासून प्रसारमाध्यमे आणि पोलिसांशिवाय माझ्या घरी कुणीच येत नसल्याची स्थिती आहे. शेजारी आणि नातेवाईकांनी देखील अंतर राखल्याचे  हरीश मल्होत्रा यांनी सांगितले आहे.

Comments are closed.