जुरेल संघात कसा काय आला? संजूवर पुन्हा अन्याय होताच श्रीकांत यांचा बीसीसीआयला सवाल

हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघातून संजू सॅमसनला पुन्हा वगळण्यात आल्याने माजी सलामीवीर आणि माजी निवड समिती सदस्य कृष्णम्माचारी श्रीकांत भडकले आहेत. सॅमसनच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत त्यांनी निवड समितीवर पुन्हा ताशेरे ओढत ध्रुव जुरेल संघात आला तरी कसा, असा सवाल केला आहे.

श्रीकांत यांनी आपल्या ‘यूटय़ूब’ चॅनेलवर पुन्हा आपला संताप व्यक्त केला, ‘पुन्हा तीच जुनी कहाणी! सॅमसनशी फारच अन्याय झाला आहे. त्याने शेवटच्या वन डेत शतक ठोकले होते तरी त्याला डावलले. एखाद्या खेळाडूला खेळवत राहता आणि मग अचानक बाहेर बसवता, हे योग्य नाही.’ वन डे क्रिकेटमध्ये सॅमसनने आतापर्यंत 14 डावांत 56.7 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 99.6 असून त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च खेळी 108 धावांची आहे.

‘हिंदुस्थानी संघनिवडीत कुछ तो गडबड है, अशी शंका व्यक्त करत श्रीकांत अन्यायग्रस्त खेळाडूच्या पाठीशी उभे राहात आहेत. आता ते संजूच्या पाठीशी उभे आहेत. एका दिवशी सॅमसनला पाचव्या क्रमांकावर पाठवतात, कधी सलामीला तर कधी सातवा-आठवा क्रमांक देतात आणि आता अचानक ध्रुव जुरेलला संधी मिळते? किमान सॅमसनला तरी बॅकअप विकेटकीपर म्हणून पहिलं संधी मिळायला हवं होतं. के. एल. राहुल मुख्य यष्टिरक्षक असणं ठीक आहे, पण सॅमसनचा पर्याय म्हणून सहभाग हवा होता.’

सतत होत असलेल्या खेळाडूंच्या फेरबदलांवरही श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘इतके बदल करून खेळाडूंचा आत्मविश्वास ढासळतोय. कधी यशस्वी जैस्वालला ठेवतात, दुसऱ्या दिवशी काढून टाकतात. अशा चॉपिंग अँड चेंजिंगने खेळाडूंचा सूर हरवतोय आणि त्यांच्या आत्मविश्वासाचेही  खच्चीकरण होतेय.’

सॅमसनला डावलल्यानंतर चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटूंनीही बीसीसीआयवर टीका केली आहे. श्रीकांतांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी उधाण आले आहे.

Comments are closed.