सेनादलाने अखेर रेल्वेला रोखले, नऊ वर्षांनंतर पुरुषांनी पटकावले कबड्डीचे राष्ट्रीय जेतेपद

शेवटच्या मिनिटांपर्यत आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानी रेल्वे संघाला अखेर सेनादलाकडून पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला. एकापेक्षा एक तगडे खेळाडू असलेल्या हिंदुस्थानी रेल्वेचा थरारक सामन्यात पाच-पाच चढायांचा डावात 6-4 असा पराभव करत सेनादलाने आपली नऊ वर्षांपासून सुरू असलेली अपयशाची मालिका संपुष्टात आणली. त्याचबरोबर सेनादलाने 71 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपदावर आपल्या नावाची मोहोर उमटवली.

कबड्डीचे राष्ट्रीय अजिंक्यपद म्हटले की, पुरुष गटात रेल्वे विरुद्ध सेनादल अशी अंतिम लढत हमखास असते. त्यातच या स्पर्धेवर रेल्वेने आजवर आपलाच दबदबा राखला आहे. सलग चार जेतेपदे पटकावल्यानंतर गेल्या वर्षी हरयाणाने रेल्वेची जेतेपदांची मालिका रोखली होती. त्यामुळे यावेळी रेल्वेच बाजी मारणार असा साऱयांचा अंदाज होता. रेल्वेत प्रो कबड्डीतील बहुतांश सुपरस्टार खेळत असल्यामुळे त्यांनाच संभाव्य विजेते मानले जात होते. उपांत्य लढतीत रेल्वेने उत्तर प्रदेशचा 42-34 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती, तर दुसरीकडे सेनादलाने पंजाबवर 43-35 अशी मात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय कबड्डीतील दोन दिग्गज आमने-सामने आले होते.

आजचा अंतिम सामनाही रोमहर्षक झाला. सुरुवातीपासून दोन्ही संघांचा गुणफलक समांतर रेषेतच धावत होता. शेवटचे मिनिट शिल्लक असतानाही रेल्वेकडे 29-28 अशी एका गुणांची आघाडी होती, मात्र तेव्हाच पंकज मोहितेची केलेल्या पकडीने सेनादलाला सामना 30-30 असा बरोबरीत सोडवण्यात यश लाभले. त्यानंतर झालेल्या पाच-पाच चढायांचा सुपर डावात आधी रेल्वेकडे आघाडी होती, मात्र सेनादलाने शेवटच्या दोन चढायांमध्ये रेल्वेच्या केलेल्या अफलातून पकडी निर्णायक ठरल्या आणि सेनादलाने 6-4 अशी बाजी मारली. गेले अनेकदा उपविजेतेपद मिळवणाऱ्या सेनादलाने 2016 मध्ये हरयाणाचा पराभव करून आपले जेतेपद पटकावले होते. अखेर नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांना जेतेपदाचा चषक उंचवण्याची संधी लाभली.

Comments are closed.