शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून व्यापक लढा उभारणार, कैलास पाटील यांचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी व शेतमजूरांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील उपस्थित राहिले होते. यावेळी कैलास पाटील यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व हक्कांसाठी व्यापक लढा उभारणार असल्याचा निर्धार केला. कैलास पाटील यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

”या बैठकीस उपस्थित राहून आपापल्या राजकीय भूमिका व मतभेद बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन संघर्ष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, बोगस बी बियाणे यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर कर्जमाफीसाठी चालढकल करत असून आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून आत्महत्यासारखे पाऊल उचलत आहे. त्यामुळे या विश्वासघातकी सरकारला वठणीवर आणण्यासाठी राज्यव्यापी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे कैलास पाटील यांनी ट्विट केले आहे.

Comments are closed.