माझ्या मृत्यूला सरकार जबाबदार; युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यानं सणादिवशीच जीवन संपवलं

राज्य सरकारच्या युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित तरुणाने सणाच्या दिवशी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे. कैलास नागरे असे या शतेकऱ्याचे नाव असून त्याने सुसाईड नोटमध्ये सरकार आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाचा 2020 सालचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास अर्जुनराव नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून सुरू केलेला लढा अखेर आपल्या प्राणांची आहुती देऊन संपवला. शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याने, जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवणी आरमाळ गावातील आणि पंचक्रोशीतील शेतकर्‍यांसाठी बारमाही पाणी मिळावे, यासाठी कैलास नागरे यांनी सातत्याने शासनाकडे मागणी केली होती. डिसेंबर महिन्यात त्यांनी सात दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. शासनाने वेळोवेळी दिलेली आश्वासने फसवी ठरल्याने 26 जानेवारी रोजी ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार होते, मात्र पालकमंत्र्यांच्या आश्वासनावर त्यांनी हे उपोषण स्थगित केले. त्यानंतर दोन महिने उलटूनही ठोस निर्णय न झाल्यामुळे 13 मार्च 2025 रोजी त्यांनी आत्महत्या केली. कैलास नागरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले – ‘शेतीसाठी सर्व सुविधा असूनही पाणी मिळत नाही. प्रशासन आणि शासनाने फसवणूक केली. माझ्या मृत्यूनंतर पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना पाणी मिळाल्यास माझे बलिदान सार्थक ठरेल.’

गावकर्‍यांचा संताप; अंत्यसंस्कारास नकार

शासन जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कैलास नागरे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. परिणामी गावात संतापाची लाट उसळली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, अशी भावना पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे एका लढवय्या शेतकऱ्याचा बळी गेला. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड आक्रमक असून पुढील काळात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

Comments are closed.