कलारंग – समचित्त अवकाशाचे चित्ररूप

<<महेंद्र दामले>>

[email protected]

विशाखाची आर्ट प्रॅक्टिस गेल्या दोन दशकांत, मी पाहात असताना ती अनेक प्रकारच्या कृतींना सामावत संपृप्त झाली आहे हे लक्षात येत गेलं. एखाद्या मोठय़ा नदीच्या भरलेल्या प्रवाहाकडे पाहताना, त्यात काळाच्या ओघात मिसळलेले अनेक छोटे प्रवाह, नद्या या दिसत नसूनही जाणवतात त्याप्रमाणे, आर्ट प्रॅक्टिसमध्ये सामावल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या कृतींमध्ये, स्केचेसच्या आधारित होणारी चित्राची मांडणी आणि मांडणीची मनात चालणारी योजना, प्रिंट्ससाठी प्लेट किंवा ब्लॉक तयार करून प्रिंट तयार करणे, कॅनव्हासवर चित्र रंगवणे, कागदाच्या लगद्याच्या आणि नंतर सिरॅमिक मातीमध्ये उत्थित आणि त्रिमित शिल्प अशा अनेक कृती आहेत. या सर्व कृती अगदी सहज, झाडाच्या फांद्या एकमेकांतून वाढतात, फुलतात त्याची प्रतिमा मनात निर्माण करतात. या कृतींकडे पाहताना एका स्त्राrच्या संवेदनेने केलेल्या कृतींची जाणीव त्यात होते.

प्रत्येक गोष्ट मन गुंतवून करणे, ती करताना त्याच्या ठरलेल्या लक्ष्यासह प्रत्येक क्षणी त्यात होणाऱया बदलाकडे बारकाईने पाहणे. संवेदनेमधून जे उमगते त्याआधारे आवश्यक तो निर्णय घेत कृती करणे अशी अनेक लक्षणे त्यात दिसतात. अशा प्रकारे कृती करताना एक नैसर्गिक सहजता असावी लागते. नाहीतर कृतींमध्ये एक लय, सौंदर्य येत नाही. याच गुणांमुळे माध्यमे बदलली तरी विशाखाचा शोध विषय- प्रतिमा बदलल्या नाहीत. सहजता या मूलद्रव्याला केंद्रस्थानी ठेवून विशाखाची आर्ट प्रक्टिस अनेक वर्षं होत आहे ते उमगते.

मला गेली काही वर्षं असे वाटे की विशाखा महाराष्ट्रातील अनेक अमूर्त चित्रकारांप्रमाणे काही समान आस्था बाळगून आहे. ज्यात पूर्वनिश्चित चित्रकल्पनेपेक्षा उत्स्फूर्त कृती करून कॅनव्हास /कागदावर कोणती दृश्य घटना घडते ते पाहणे. त्या दृश्याच्या आधारावर सुचणाऱया कृती करत चित्र घडवणे असे त्याचे स्वरूप असते.

काळाच्या ओघात मला अनेक वेळा तिच्या चित्रातील मोकळे अवकाश, जे अनेक वेळा थोडे गडद, अंधारे असते त्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. अनेक वेळा हे अवकाश एखाद्या तलावाची आठवण करून देते. तलावाच्या कडेला एखादा दगड, फांदी काठावरून सहज पाण्यात लुप्त होतात तसे विशाखाच्या चित्रातील प्रतिमा या अवकाशामध्ये सहजपणे गुडूप होतात.

हे अवकाश दृश्यपातळीवर डोळ्यांना दिसणाऱया अवकाशाप्रमाणे वाटते, पण ते मनातील अवकाशाच्या विस्तीर्ण अथांगतेमध्ये अगदी काही पावलातच रूपांतरित होते. त्याचमुळे या दृश्यातून अनेक भावनांची, विचारांची, आस्थांची कंपने ऐकू येतात. हे अवकाश काही गुंजन करणारे, हाक मारणारे आहे. ते जणू श्वासोच्छ्वास करत आहे. त्या लयीत काही आकारांना, रेषांना, रंगांना आपल्यात ओढून घेत आहे आणि हळूच निःश्वासाबरोबर सोडूनही देत आहे.

अमूर्त चित्र पाहताना बऱयाच वेळा चित्रकारांना चित्ररूप कोणत्या दृश्यामुळे सुचलं, स्फुरलं त्याचा अंदाज येत असतो. विशाखाच्या प्रतिमांमध्येसुद्धा स्त्राrचे पाय, जमिनीवर पडलेल्या वस्तू, कपडे, फर्निचरचे काही भाग अशा अनेक गोष्टी दिसत आहेत. परंतु तुमची नजर तिकडे थांबून राहत नाही. या सर्व गोष्टी जणू चित्राच्या अवकाशात हळूच, अगदी उगीपणे फक्त आहेत. त्याच्यावरून आपली नजर सहज मोकळ्या अवकाशाकडे घरंगळते आणि आपण हळूहळू समचित्त होऊ लागतो. डोळ्यांना काही दिसत राहते, पण आपण ते पाहात, निवडत नाही. फक्त श्वासाची लय ऐकू येते.

मला वाटते की विशाखाला एका अवकाशात, सोबतच्या पसाऱयासोबत राहून हळूहळू, समचित्त होण्यासाठी अवकाश साद घालते. त्यात स्वतला मिसळून, हरवून अनुभवणे याचे मर्म उमगले आहे. तिची चित्र त्या समचित्त करणाऱया अवकाशाचे रूप आहे.

‘मॅप्ड बाय टाईड अँड टाइम’ (काळाची लय रेखांकित करताना…) हे विशाखा आपटे यांच्या चित्र, शिल्प आणि मुद्राचित्रे यांचे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे 14  एप्रिलला सुरू  झाले आहे. ते 20  एप्रिल, 2026 पर्यंत सकाळी 11  ते संध्याकाळी 7  पर्यंत सर्वांना  पाहण्यासाठी खुले राहील.

Comments are closed.